। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ ग्रामपंचायतीचे माजी उप सरपंच मंगेश राजाभाऊ म्हसकर यांनी आपली आवड म्हणून बाग फुलवली आहे. पावसाळ्यात भाताच्या शेतीत रमणारे म्हसकर यांनी आपल्या मालकीच्या जमिनीमध्ये सर्व प्रकारचा भाजीपाला आणि विविध फळांची शेती केली आहे. दरम्यान, दररोज सकाळी शेतीसाठी वेळ देणारे म्हसकर यांच्या बागेत पांढर्या कांद्यापासून कोबी, फ्लॉवर आणि शेवग्याच्या शेंगांची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही शेती सेंद्रिय खतांचा वापर करून केली जात आहे.
नेरळ पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या माथेरान डोंगरातून वाहणार्या नाल्याच्या बाजूला मंगेश म्हसकर यांची शेती आहे. त्या शेतात त्यांनी भाजीपाल्यासह फळ झाडांची बाग फुलवली आहे. या बागेमध्ये दहा वर्षापूर्वी 600 शेवग्याची झाडे लावण्यात आली होती. गेली आठ वर्षे शेवग्याचे पिक म्हसकर यांना मिळत आहे. प्रामुख्याने हॉटेलमधील सांबार बनविण्यासाठी शेवग्याच्या शेंगाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचबरोबर इलायची केळी (सुकेळी), आंब्याच्या विविध जाती, चिकू, पेरू, डहाणूचे जांभूळ या सोबत विविध फळांच्या झाडांची देखील लागवड करण्यात आली आहे. तसेच, म्हसकर यांच्या बागेत संत्र आणि सफरचंद यांची देखील झाडे आहेत.
पांढरा कांदा बहरला
म्हसकर यांनी आपल्या बागेत मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची शेती केली आहे. त्यात टोमॅटो, वांगे, सिमला मिरची, चिखट मिरची, भेंडी, काकडी, गाजर, फ्लॉवर, कोबी, कारले, दुधी, घोसाळे आदी भाज्या आपल्या बागेत फुलविली आहेत. तर, पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर, पालक, मुळा, मेथी यांची शेती देखील फुलवली आहे. त्याचबरोबर म्हसकर यांनी एक वेगळा प्रयत्न देखील केला आहे. त्यांनी आपल्या शेतात तब्बल एक एकर जमिनीवर अलिबागची ओळख असलेल्या पांढर्या कांद्याची लागवड केली आहे. ही रोपे त्यांनी अलिबाग येथून आणली होती. आणि आता हा पांढरा कांदा बहरला आहे.
सर्व शेती सेंद्रिय खतांवर
म्हसकर यांच्या बागेतील सर्व भाज्या आणि पालेभाज्या तसेच फळझाडे यांना केवळ सेंद्रिय खते दिली जातात. त्यात लेंडी खत आणि शेण खत यांचाच वापर केला जात असून त्याचा फायदा आपल्या शारीरिक वाढीसाठी महत्वाची ठरत असल्याने सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.