पनवेल महानगरपालिकेचा दावा
। पनवेल । वार्ताहर ।
मागील वर्षी हवेतील धूलिकण कमी करण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे वर्षाच्या शेवटी पनवेल महापालिका क्षेत्रात साडेतीनशे बांधकामे सुरू असूनही धूलिकणांमुळे गुणवत्ता निर्देशांकाचे प्रमाण वाढले नाही, असा दावा महापालिकेने केला आहे. पालिकेने उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने 164 बांधकाम व्यावसायिकांना नियमांचे पालन करण्यासाठी नोटिशीद्वारे सूचना दिल्या.
पालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभाग स्तरावर निरीक्षण व कारवाईसाठी विशेष समित्या स्थापन करुन सहाय्यक आयुक्तांना बांधकाम थांबविण्याचा व त्वरित कारवाई करण्याचा अधिकार दिल्याने बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. याशिवाय स्वच्छतेसाठी विविध यांत्रिकी उपाययोजना केल्याचा लाभ पनवेलमध्ये होताना दिसत आहे.
महापालिकेने चार फॉग कॅनन वाहने तैनात केली असून त्या माध्यमातून हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी पाण्याचा फवारा केला जातो. या वाहनांनी दररोज 240 कि.मी. क्षेत्राचा परिसराची स्वच्छता केली जाते. तसेच रस्त्यांची स्वच्छता व पाण्याच्या फवारणीसाठी धूल प्रतिबंधक वाहनांचा वापर केला जातो. दिवाळीपूर्वी डीप क्लीन ड्राईव्ह सुरू करण्यात आले असून यासाठी शंभराहून अधिक कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पनवेल पालिकेचे उपायुक्त डॉ.वैभव विधाते यांनी दिली.
न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार हवेची गुणवत्ता पाहता महानगरपालिका हवेतील धूलिकणाचे प्रदूषण कमी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. यामुळे हवेतील गुणवत्तानिर्देशांकात सकारात्मक बदल दिसत आहे, असे पनवेल आयुक्त मंगेश चितळे म्हणाले.