मुरुड ग्रामीण रुग्णालयाची दुरवस्था

विशेष दुरुस्तीसाठी कार्यक्रम मंजुरीचा प्रस्ताव धूळ खात

| अलिबाग | प्रमोद जाधव |

पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या मुरूडमधील ग्रामीण रुग्णालयात अपुऱ्या सुविधा आहेत. वेगवेगळ्या दुरुस्तीसह बांधकाम करण्याची मागणी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांनी पत्र देऊन केली आहे. अलिबागमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे अनिवासी इमारत विशेष दुरुस्तीसाठी मंजुरी देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे पावसाळ्यात ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

मुरूडमधील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम 50 ते शंभर वर्षांपूर्वीचे आहे. दुरुस्तीअभावी या इमारतीमध्ये पावसाळ्यात छप्पर गळतीचा त्रास कायम आहे. त्याचा रुग्णांना नाहक त्रास होतो. ही बाब अतिशय गंभीर आहे. विशेष दुरूस्ती अंतर्गत गेल्या अनेक महिन्यांपासून निधी मंजूर करण्याची मागणी ग्रामीण रुग्णालयाकडून करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारासमोर कॅटल ट्रॅपसह ट्रेनेज दुरुस्ती बांधकाम करणे. फतिमा बेगम रुग्णालयातील लिक्वीड ऑक्सिजन प्लांटसाठी गेटसह शेड बांधकाम करणे. रुग्णालयाच्या दोन्ही आवारातील इमारतीमध्ये वाळवी प्रतिबंधात्मक उपचार करून पेस्ट कंट्रोल करणे.

वैद्यकीय अधीक्षक यांच्या निवासस्थान आवारात पेवर ब्लॉक बसविणे. लॅबसाठी वॉश बेसिनसह ओटा बांधणे. अपघात विभाग रॅम्प ठिकाणी शेड बनविणे, कार्यालयाच्या दोन्ही मोठ्या दरवाजाच्या ठिकाणी पत्र्याचे शेड बांधणे. विद्युत जनरेटर शेड बनविण्याबरोबरच त्या शेडला बंधिस्त करणे. वैद्यकीय अधीक्षक यांच्या कार्यालयाला सीलींग बसविणे. रुग्णालयाच्या इमारताली प्लास्टरसह रंगरंगोटी करणे. डायलेसीस वॉर्ड बनविणे. साधन सामुग्री ठेवण्यासाठी मोठे स्टोअर रुम बनविणे. अधिपरिचारिका शासकीय वसाहत रुम अपुऱ्या असल्याने नवीन शासकीय वसाहत गृह बांधकाम करणे. नवीन शस्त्रक्रिया गृह बांधणे. पावसाळ्यात होणारी गैरसोय लक्षात घेता अंतर्गत भागातील सांडपाण्याचे नियोजन करणे. रुग्णालयाच्या मागील बाजूला मुरूड नगरपरिषदेने नवीन गार्डनचे बांधकाम केले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जाण्याचे मार्ग पूर्णतः बंद झाला आहे. येणाऱ्या पावसाळ्यात पावसाचे पाणी साठून रुग्णसेवा ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रुग्णवाहिका शेड बसविण्याबरोबरच विद्युत दुरुस्तीचे कामे करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा अनेक समस्यांनी मुरूडमधील ग्रामीण रुग्णालय ग्रासलेले आहे. वेगवेगळ्या दुरुस्तीसह बांधकाम करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याला मंजुरी अद्याप दिली नाही. त्यामुळे या पावसाळ्यात ग्रामीण रुग्णालयातील सेवेवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण रुग्णालय शंभर वर्षे जुने आहे. या इमारतीला कौल टाकलेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात गळती होऊन पाणी मोठ्या प्रमाणात साचले जाते. परिचारिकांच्या वसाहतीला गळती लागते. इमारतीच्या आजूबाजूला पाणी साचते. ऑपरेशन थेटरपासून सर्व ठिकाणी पाणी साचते. अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला आहे. मागील दोन दिवसांपूर्वी इमारतीच्या दुरुस्तीसाठी 45 लाखांचे अंदाजपत्रक आले आहे. मंजुरीनंतर दुरुस्तीचे काम सुरु केले जाणार आहे. त्यामुळे या पावसाळ्यात पुन्हा अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ येणार आहे.

डॉ. उषा चोले, वैद्यकीय अधीक्षक,
ग्रामीण रुग्णालय मुरूड

Exit mobile version