दुरुस्ती न झाल्यास आंदोलन, टॅक्सी चालक-मालक संघटनेचा इशारा
| नेरळ | प्रतिनिधी |
पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये येण्यासाठी एकमेव असा नेरळ-माथेरान घाट रस्ता आहे. या घाट रस्त्याची झालेली दुरवस्था यावर बांधकाम विभागाने तात्काळ कार्यवाही करून रस्त्याची सुधारणा करावी. अन्यथा दि.1 जून रोजी नेरळ येथील हुतात्मा चौकात रस्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेने दिला आहे.
नेरळ-माथेरान टॅक्सी चालक-मालक सेवाभावी संस्थेकडून नेरळ-माथेरान घाट रस्त्याच्या अत्यंत दयनीय अवस्थेकडे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात आले आहे. माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या घाट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे पर्यटकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना या घाटात स्वतःची गाडी चालवणे अत्यंत कठीण झाले असून, खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. रस्ते खराब असल्याने वाहनांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असते. खड्ड्यांमुळे स्थानिक टॅक्सी चालकांच्या वाहनांचे देखील अतोनात नुकसान होत असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच, काही दिवसांवर येऊन ठेपलेला पावसाळा आणि सध्याचा सुरू असलेला पर्यटनाचा हंगाम लक्षात घेऊन रस्त्याची सुधारणा करण्याची गरज आहे.
मात्र, नेरळ-माथेरान घाट रस्त्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष हो आहे. बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. येत्या काळात पर्यटकांची संख्या वाढणार आहे, जर रस्ता दुरुस्त झाला नाही तर पर्यटनावर त्याचा विपरीत परिणाम होईल. दरम्यान, पुढील 15 दिवसांत नेरळ-माथेरान घाट रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून रस्ता सुस्थितीत करावा. घाटातील संरक्षक कठड्यांची दुरुस्ती करावी. रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासून कायमस्वरूपी सुरक्षितता निर्माण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मान्य झाली नाही तर दि.1 जून रोजी नेरळ-माथेरान घाटात एकही वाहन चालू देणार नाही. तसेच, नेरळ-माथेरान घाट रस्ता येथील हुतात्मा वीर भाई कोतवाल प्रवेश द्वार येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा टॅक्सी चालक-मालक संघटनेकडून देण्यात आला आहे.







