राजीव गांधी मैदानाची दुरवस्था

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
नवीन पनवेल, सेक्टर 11 येथील राजीव गांधी मैदानात पैसे घेऊन बस पार्किंग केल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच या मैदानात कचरा, मातीचे ढीग, डेब्रीज टाकले जात असून मैदानाची दुरवस्था झाली आहे. पैसे वसूल करणार्‍यावर कारवाईची मागणी केली जात आहे. रात्रीच्या वेळेस मद्यपी येथे हैदोस घालत आहेत. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही.

नवीन पनवेल येथील राजीव गांधी मैदानात महापालिकेच्या माध्यमातून राजीव गांधी मैदानात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. त्याचे उद्घाटन देखील काही महिन्यांपूर्वी करण्यात आले. मात्र सद्यस्थितीत येथील फुटपाथवर चिकन व मटण विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे क्रीडाप्रेमींना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. मागील महिन्यात पनवेल पालिकेने येथे कारवाई केली होती. मात्र त्याला न जुमानता पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या नाकावर टिच्चुन पुन्हा दुसर्‍याच दिवशी फुटपाथवर चिकन व मटण विक्रेत्यांनी दुकाने उभारली. स्वयंघोषित समाजसेवक येथे हफ्ते गोळा करत असल्याने अतिक्रमण करणार्‍यांना पाठबळ मिळत आहे. चिकन व मटण विक्रेत्यांमुळे खरेदी करणारे नागरिक रस्त्यावर गाड्या पार्क करतात. त्यामुळे येथे नित्याची वाहतूक कोंडी होते. त्यामुळे चिकन व मटण विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी क्रीडाप्रेमी करत आहेत. क्रीडांगणाची दुरावस्था पाहिल्यावर सिडको आणि पालिका प्रशासनाचे येथे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळत आहेत.

Exit mobile version