पावसाळ्यात जनजीवनावर परिणाम
| कोर्लई | वार्ताहर |
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झालेल्या मुरुड तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील बारशिव ते काजूवाडी रस्त्याची ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. कामे वेळेत पूर्ण न झाल्याने याचा येथील जनजीवनावर परिणाम झाला आहे.तातडीने चांगल्या सुस्थितीतील रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी भोईघरचे माजी सरपंच नथुराम महाडिक यांनी केली आहे.
बारशिव काजूवाडी रस्त्याच्या कामाची लांबी चार किमी आहे व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाले आहे. या कामासाठी 2,8,760000/- निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या कामाला, नोव्हेंबर 2020, मध्ये सुरुवात झाली होती,काजुवाडी मध्ये दोनशे मीटर काँक्रीट करून पुढे सर्व रस्त्यावर डबर टाकून माती टाकून ठेवली व ठेकेदारांनी बिल काढून घेतले असल्याची चर्चा आहे. तेव्हा पासून कामाकडे दुर्लक्ष केले आहे.या बाबतीत भोईघर ग्रामपंचायत च्या 30-6-2022 रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी ठराव मांडला होता की,ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, पण त्यांच्यावर कारवाई झाली नाही उलट ग्रामस्थांनी केलेल्या ठरावाला बहूधा केराची टोपली दाखवली. यासंबंधी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या उप, विभागीय अधिकारी गोरे, कार्यकारी अभियंता मंत्री यांच्याकडे दुरध्वनी वरून अनेक वेळा बोललो होतो पण त्यांनी आश्वासन देऊन देखील काम करून घेतले नाही.अशी प्रतिक्रिया भोईघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नथुराम महाडिक यांनी व्यक्त केली आहे.
बारशिव,भोईघर या गावांत अडीच किमी अंतर आहे पण हा रस्ता गेले तीन वर्षे वाहतूक साठी पूर्ण बंद आहे.या गावात जायचे असेल तर सहा किमीवरुन वळसा घालुन जावे लागते.आतापर्यत ाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागले असून अनेक जणांना हात पाय मोडून घ्यावे लागले आहेत.याला जबाबदार कोण?असा सवालही त्यानी उपस्थित केला आहे.
या रस्त्यावरून मुरुड, अलिबाग, मुंबई साठी एस्.टी.बस सेवा सुरु होती ती रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अद्याप बंद आहे,याचा शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील जनतेला बारशिव-काजूवाडी रस्त्याकडे शासनाच्या संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष पुरवून चांगल्या व सुस्थितीतील रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
नथुराम महाडिक, माजी सरपंच