रायगड जिल्ह्यात पोपटी पार्ट्यांना सुरूवात

रुचकर स्थानिक गावठी वालांची प्रतीक्षा
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
जिल्ह्यात पोपटी पार्ट्यांची चवदार रंगत सुरु झाली आहे. वालाच्या शेंगा भामरुडाच्या (भांबुर्डी) पाल्यात मडक्यामध्ये मोकळ्या आगीवर विशिष्ट पद्धतीने शिजविल्या जातात. त्यामध्ये कांदा व बटाटा तसेच अंडी, चिकन घालून त्यांची लज्जत वाढविली जाते. यालाच पोपटी असे म्हणतात. सध्या जिल्ह्यात पोपटी पार्ट्यांची धम्माल सुरु झाली आहे. जिल्ह्यातील रुचकर स्थानिक गावठी वालाच्या शेंगा तयार होण्यास उशीर लागणार आहे. त्यामुळे खवय्यांना पुण्यावरुन आलेल्या वालाच्या शेंगांवरच समाधान मानावे लागत आहे. मागील वर्षी 40 रुपये किलोने मिळणार्‍या पुणेरी वालाच्या शेंगा यंदा 60 रुपये किलोने मिळत आहेत. जिल्ह्याच्या मातीत पिकविलेल्या चवदार टपोर्‍या दाण्याच्या गावठी शेंगांच्या पोपटीलाच अधिक पसंती आहे. मात्र पोपटी हंगाम सरून जाऊ नये म्हणून सध्या येथील स्थानिक गावठी शेंगा अजुन तयार झाल्या नसल्याने पुण्यावरुन आलेल्या शेंगावर खवय्यांना सध्या समाधान मानावे लागत आहे. विदर्भात, खानदेशात ज्याप्रमाणे ज्वारी किंवा बाजरीच्या कणसांना भाजुन केलेला हुर्डा प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणेच जिल्ह्यामध्ये गावठी वालाच्या शेंगांची पोपटी प्रसिद्ध आहे. ठिकठिकाणी शेतावर किंवा घराबाहेर मोकळ्या जागेत पोपटी पार्ट्यांची धम्माल पहायला मिळते. येथे काही ठिकाणी काव्यसंमेलन रंगतात तर गप्पा गोष्टींच्या मैफिलीमध्ये सुखदुःखाची देवाण घेवाणही होते. अनेक जणांना यातून चांगले उत्पन्न मिळते.

Exit mobile version