जिभेच्या चवीबरोबर बहारदार काव्याची मैफिल
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
पाली सुधागडसह रायगड जिल्ह्यातील पोपटी पार्टीची मज्जा काही औरच आहे. वालाच्या शेंगा खातांना गप्पा गोष्टींची मैफल जमते. आणि सुख-दुःखांची देवाण घेवाण होते. याबरोबरच पोपटी कविसंमेलने देखील रंगतात. मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेली पोपटी कविसंमेलने आता पुन्हा बहरू लागली आहेत.
या पोपटी काव्य मैफिलीत कवितांबरोबर पोपटीचाही आस्वाद घेतला जातो. कानात काव्यांचा गुंजराव आणि जिभेवर लज्जतदार वालाचे दाणे आणि चविष्ट जिन्नस मन आणि जठराग्नी तृप्त करते. पोपटी पार्टी बरोबर ही काव्य संमेलने अतिशय रंगतदार व मजेदार होत आहेत. यावेळी नवनवीन कविता तसेच बोली भाषेतील कवितांचे सादरीकरण केले जाते. नवोदित व तरुण कवींना देखील आपल्या प्रतिभा सादर करण्याची नामी संधी या पोपटी कवी संमेलनात मिळते. त्यामुळे ते येथे आवर्जून हजेरी लावतात.
या वर्षी देखिल जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोपटी काव्य संमेलने दिग्गज कवींच्या उपस्थितीत संपन्न झाली. नुकतेच कोमसाप शाखा पनवेल व उत्कर्ष सांस्कृतिक, कला आणि क्रीडा मंडळ नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथील तामसई (धुंदरे) येथे पोपटी संमेलन पार पडले. या वर्षीचे हे पोपटी कवि संमेलन तेरावे असून, या संमेलनाला नाट्यनिर्माता विनोद नाखवा, रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील, कवी अरुण म्हात्रे, ठाणे मा. महापौर प्रेमसींग राजपूत, कोमसापचे सुधीर शेठ, मनोज भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन राकेश भुजबळ आणि गणेश कोळी यांनी केले होते. या बरोबरच वाजे, रिटघर, चिरनेर, सुकापूर, तामसई धुंदरे, मांडवा आदी विविध ठिकाणी देखील पोपटी संमेलने झाली आहेत. आणि होत आहेत.

रायगडच्या मातीतल्या या पोपटी संमेलनाची जागतिक स्तरावर ओळख झाली पाहिजे. पोपटी संमेलनात प्रतिभावंत नवोदित व जाणकार कवींचा समावेश वाढत आहे. त्यामुळे पोपटी संमेलनाचा दर्जा देखील उंचावत आहे. -अरुण म्हात्रे, प्रसिद्ध कवी
कोरोनामुळे दोन वर्षांपासून पोपटी कवी संमेलने बंद होती. मात्र आता पुन्हा पोपटी कवी संमेलनाच्या मैफिली रंगू लागल्या आहेत. त्यामुळे खूप आंनद होत आहे. -प्रा. एल. बी. पाटील, रायगड भूषण, कवी