अल्पवयीन मुलीचे अश्‍लिल फोटो व्हायरल

उत्तरप्रदेशमधून आरोपींना अटक
। पनवेल । वार्ताहर ।
सोशल मीडियावर 15 वर्षीय मुलीचे अश्‍लिल फोटो व्हायरल करून तिची बदनामी करणार्‍या दोन आरोपींना उत्तर प्रदेश येथून अटक करण्याची कामगिरी तळोजा पोलिसानी केली आहे. मोहम्मद आरिफ मनीर अहमद (22) आणि यासीन अहमद नसिरुद्दिन अहमद (22) अशी या आरोपींची नावे असून त्यांनी गत जून महिन्यामध्ये पीडित मुलीचे फोटो व्हाट्सअप वरून वायरल केले होते.

या घटनेतील पीडित 15 वर्षीय मुलगी मुळची उत्तर प्रदेश राज्यातील असून तिचे वडील तळोजा येथे कामानिमित्त राहण्यास आहेत. गत जून महिन्यामध्ये पीडित तरुणी तळोजा येथे राहणार्‍या वडिलांकडे आली होती. त्यावेळी तळोजा भागातील काही तरुणांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पीडित मुलीचे नग्न व अश्‍लिल फोटो व्हायरल झाले होते. ही बाब पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी तळोजा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात पॉक्सो सह विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली होती.

या प्रकरणाच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशीनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. ज्या व्हाट्सअप ग्रुप वर पीडित मुलीचे फोटो व्हायरल झाले होते, त्या व्हाट्सअप ग्रुपच्या मदतीने पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता, सदर आरोपी उत्तर प्रदेश राज्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान नांगरे, पोलीस नाईक विजय पाटिल, निवृत्ती चंदेवाड, वैभव शिंदे यांचे पथक उत्तर प्रदेश येथे रवाना करण्यात आले होते. सदर पथकाने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना उत्तर प्रदेश मधील बलिया जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केली. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींचे मोबाईल फोन जप्त करून त्यांची तपासणी सुरू केली आहे.

Exit mobile version