| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
भारतीय संस्कृतीत सण, उत्सव व परंपरेला महत्त्वाचे स्थान आहे. सध्या निसर्ग व पर्यावरणपूरक सण साजरे करणे काळाची गरज आहे. गणेशोत्सव हा सण आनंद, उत्साह, मराठी अस्मिता, परंपरा व भारतीय संस्कृती जतन करणारा सण आहे. निसर्ग व पर्यावरणपूरक सणातून सकारात्मक ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन आ.अनिकेत तटकरे यांनी केले.
खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून आ. अनिकेत तटकरे व आ. आदिती तटकरे यांच्या सहकार्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गौरी व गणपती आरास सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. पाली शहरातील विजयी स्पर्धकांना आ. अनिकेत तटकरे यांच्या हस्ते प्रथम क्रमांक राजेंद्र अंबिके (स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव), द्वितीय : विजय रावताळे (महाभारत पुराण लेखण देखावा) व तृतीय क्रमांक -: आदित्य काटकर (वृक्षसंवर्धन देखावा) यांना पारितोषिक वितरीत करण्यात आले. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रोख रक्कम 7000 व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकास 5000 रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकास 3000 रुपये व आकर्षक चषक व उत्तेजनार्थ 2000 रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
आ.अनिकेत तटकरे यांनी मोटारसायकलवर बसून ठिकठिकाणी गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी पाली नगराध्यक्ष गीता पालरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंके, शहर अध्यक्ष अभिजित चांदोरकर, महिला शहर अध्यक्ष सुजाता जवके, युवक सुधागड तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे, नगरसेवक सुलतान बेनसेकर, सुधीर भालेराव, आकाश शिंदे, वैभवी साखरले, ललित ठोंबरे, महेश बारमुख, किरण खंडागळे, सुशील शिंदे, प्रशांत नागोठकर, सुरेश मेंढण, वेत्रवान गुरव, विकास गडगे, दत्तात्रेय काटकर, शेखर राऊत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.