15 सप्टेंबरपर्यंत मार्गिका सुरू होणे अशक्य
ठेकेदाराच्या कामाच्या गतीवर प्रश्नचिन्ह
| माणगाव | प्रतिनिधी |
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव-इंदापूर बाह्यवळणाचा रखडलेला प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सवापूर्वी बाह्यवळणाची किमान एकेरी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून वारंवार दिले जात आहे. परंतु, सद्यस्थिती पाहता दि.15 सप्टेंबरपर्यंत एकेरी वाहतूक सुरू होणेही अशक्यप्राय असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाही कोकणच्या दिशेने जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना माणगाव शहरातील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाचे वर्षीही महामार्गावर वाहतूक कोंडीचे विघ्न अटळ आहे.
गेल्या काही काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे तसेच पालकमंत्री भरत गोगावले यांनी महामार्ग व माणगाव बाह्यवळणाच्या कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदाराकडून कामाचा आढावा घेतला. त्यावेळी गणेशोत्सवापूर्वी किमान एक मार्गिका सुरू करण्याच्या सूचना आणि आश्वासने देण्यात आली. खासदार सुनील तटकरे यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन माणगाव व इंदापूर बाह्यवळणाच्या अपूर्ण कामाकडे लक्ष वेधले. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात तरी कोकण वासीयांचा प्रवास सुकर होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र पाहणी दौरे, बैठका आणि आश्वासनांची रेलचेल सुरू असताना प्रत्यक्ष कामाची गती मात्र नागरिकांच्या अपेक्षे प्रमाणे वाढलेली दिसत नाही. बाह्यवळण मार्गावरील अनेक महत्त्वाची पुलांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. काही ठिकाणी प्राथमिक स्वरूपाचे बांधकाम झाले असले तरी पुलांचे गर्डर, डेक स्लॅब, जोड रस्ते, मातीचा भराव आणि अंतिम रस्ते बांधणीची कामे बाकी असल्याचे दिसून येते. विशेषतः कोकण रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल आणि कळमजे फाटा येथील गोधनदी वरील पुलाच्या कामाची गती हा गंभीर प्रश्न ठरत आहे. पुलांचे काम पूर्ण झाल्या नंतरही मोठ्या प्रमाणावर मातीचा भराव, त्याचे योग्य संपीडन, रस्त्याची पातळी निश्चित करणे, डांबरी करण आणि वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक सुरक्षा व्यवस्था करावी लागणार आहे. त्यातच सध्या मुसळधार पावसाचा हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर भराव व रस्ते बांधणीची कामे वेगाने पूर्ण करण्यास तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत.
त्यामुळे गेल्या 17 वर्षांपासून रखडलेल्या माणगाव-इंदापूर बाह्यवळण मार्गाबाबत केवळ तारखांवर तारखा मिळत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. प्रत्येक वेळी नवीन मुदत, नवीन आश्वासन आणि नवीन पाहणी दौरा होतो. परंतु, प्रत्यक्षात मात्र बाह्यवळण वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने खुला होण्याची तारीख पुढेच ढकलली जाते. त्यामुळे नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे. लोकप्रतिनिधींनी कामाचा आढावा घेणे ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे; मात्र, पाहणी करून आश्वासन देण्यापेक्षा ठेकेदाराकडून प्रत्यक्ष काम करून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. ठेकेदाराला कामाची मुदत 2027 पर्यंत असल्याने गणेशोत्सवापूर्वी काम पूर्ण करण्याच्या घोषणा कितपत वास्तववादी आहेत, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
दरम्यान, कामाच्या प्रत्यक्ष प्रगतीबाबत संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींना पूर्ण वस्तुस्थिती सांगितली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. पाहणीच्या वेळी निवडक ठिकाणचे काम दाखवून उर्वरित अपूर्ण कामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची देखील चर्चा आहे. जर कामाची खरी प्रगती समाधानकारक असेल, तर संपूर्ण प्रकल्पाची सद्यस्थिती सार्वजनिक करण्यास अडचण काय, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
लोकप्रतिनिधी ठेकेदारांच्या आश्वासनांवर विसंबून
माणगाव-इंदापूर बाह्यवळण हा केवळ रस्ता प्रकल्प नाही, तो कोकणातील लाखो नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाशी जोडलेला प्रश्न आहे. 17 वर्षांच्या विलंबानंतरही जर प्रत्येक गणेशोत्सवा पूर्वी नव्या तारखा आणि नव्या घोषणा ऐकाव्या लागत असतील, तर या प्रकल्पाच्या नियोजनावर आणि देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. लोकप्रतिनिधींनीही केवळ ठेकेदाराच्या आश्वासनांवर विसंबून न राहता कामाच्या प्रत्येक टप्प्याचे वस्तुनिष्ठ परीक्षण करणे गरजेचे आहे. तसेच, कामाची दिवसागणिक प्रगती तपासावी, अपूर्ण कामांची स्पष्ट यादी जाहीर करावी आणि गणेशोत्सवाच्या वाहतुकीसाठी ठोस पर्यायी नियोजन करावे. कारण या प्रकल्पाची जबाबदारी केवळ ठेकेदाराची नसून, नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची राजकीय जबाबदारी लोकप्रतिनिधींचीही असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.







