। उरण । प्रतिनिधी ।
उरण शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी असून, लवकरच पोस्ट कार्यालय पुन्हा उरण शहरात सुरू होणार आहे. जेएनपीटी शॉपिंग सेंटर येथे हलविण्यात आलेल्या पोस्ट कार्यालयामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत होता. विशेषतः जेष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि दैनंदिन कामांसाठी पोस्ट कार्यालयावर अवलंबून असलेल्या ग्राहकांचे मोठे हाल होत होते.
उरण शहरातील आनंदनगर येथील जुन्या पोस्ट कार्यालयाची इमारत पुनर्विकासासाठी गेल्यानंतर हे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात जेएनपीटी शॉपिंग सेंटर येथे हलविण्यात आले होते. मात्र शहरापासून दूर गेलेल्या या कार्यालयामुळे सामान्य नागरिकांना प्रवासाचा अतिरिक्त खर्च, वेळेचा अपव्यय आणि गैरसोयींचा सामना करावा लागत होता. यामुळे पोस्ट कार्यालय पुन्हा शहरात सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. अखेर या मागणीला यश आले असून, लवकरच उरण शहरात नव्या ठिकाणी पोस्ट कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. सदर पोस्ट कार्यालय हे कामठा रस्त्यावर शामियाना हॉटेल समोरील युनियन बँकेच्या वरच्या मजल्यावर सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विशेषतः जेष्ठ नागरिकांना पेन्शन, बचत खाते, मनीऑर्डर, पोस्टल व्यवहार आणि विविध शासकीय कामांसाठी वारंवार पोस्ट कार्यालयात जावे लागते. तसेच महिला वर्गालाही दैनंदिन व्यवहारासाठी मोठी गैरसोय होत होती. आता पोस्ट कार्यालय शहरातच सुरू होत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
उरणकरांना दिलासा; पोस्ट कार्यालय पुन्हा शहरात
