नाना पाटील यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतच्या कामाची दखल

| अलिबाग । प्रतिनिधी ।

धगधगत्या क्रांतीपर्वाचे नायक, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी संघर्ष करणारे नारायण नागू पाटील तथा आप्पासाहेब यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. राजे, भोसले, फुले, शाहू आंबेडकर चळवळीत उल्लेखनीय व मोलाचे योगदान दिल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला. नाना पाटील यांची नातसून, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ सभापती चित्रा पाटील यांनी हा पुरस्कार ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहात एका सोहळ्यात स्वीकारला.

क्रांतीदिनाचे औचित्य साधत नुकताच आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्सतर्फे 70 महान कर्तृत्ववान व्यक्तींना यंदाचा मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कर्मवीर सुनील खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय वाटचालीस दिलेल्या सक्रीय योगदानाबद्दल तसेच राजे, भोसले, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीत उल्लेखनीय व मोलाचे योगदान देऊन संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी आपले आयुष्य अर्पण केलेल्या महान व्यक्तींना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सावकाराविरोधात चरी येथे शेतकर्‍यांनी संप पुकारला होता. या लढ्याला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला होता. नाना पाटील यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.


ना.ना. पाटलांनी शेतकर्‍यांना संघर्षाची जाणीव करुन दिली
चित्रा पाटील यांचे प्रतिपादन

पिढ्यान्पिढ्या खोती पद्धतीत गुलाम म्हणून जगणार्‍या कोकणातील शेतकर्‍यांना नारायण नागू पाटील (आप्पासाहेब) यांनी संघर्षाची जाणीव निर्माण करुन दिली. त्यास घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीही तितकीच साथ होती, यामुळे अलिबाग परिसरात जगातील शेतकर्‍यांचा पहिला संप यशस्वी करता आला. शेतकर्‍यांच्या संपातून कुळ कायद्याची पायाभरणी झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलने उभारली गेली. नारायण नागू पाटील यांनी शेतकर्‍यांना संघटित करुन संप पुकारलेला चरी येथील संप तब्बल सात वर्षे चालला. खोती पद्धतीला सुरुंग लावण्याचे काम या संपाने केले. खोतांच्या भांडवलशाही विरुद्ध प्रदीर्घ कालावधीमध्ये लढून न्याय मिळवून देण्यात नारायण नागू पाटील यांनी काम केले. त्यामुळे येथील शेतकर्‍यांना सन्मानाने जगता येत आहे. आज शेतकर्‍यांचे प्रश्‍न वेगळे आहेत. कोकणातील शेतकर्‍यांसमोर खार्‍या पाण्याने शेती नापिक होत आहे. खारबंदिस्ती नादुरुस्त झाल्याने शेतात खारे पाणी येत असल्याने पिकत्या शेतात कांदळवने उगवू लागली आहेत. यातून रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे खूप मोठे नुकसान होत आहे. याविरुद्ध शासनाला जागे करण्यासाठी येथील शेतकर्‍यांनी लढण्यासाठी एकत्रित येणे आवश्यक असल्याचे चित्रा पाटील यांनी यावेळी सांगितले.
Exit mobile version