शॉर्टकट बनला ‘त्रासकट’! पनवेल-खांदा वसाहत अंडरपासमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य

विद्यार्थी आणि वाहनचालकांचा जीव टांगणीला; तातडीने दुरुस्तीची मागणी

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल शहरातून खांदा वसाहतीत जाण्यासाठी सोयीचा आणि वेळेची बचत करणारा मार्ग म्हणून ओळखला जाणारा चांगू काना ठाकूर महाविद्यालयाजवळील रेल्वे अंडरपास सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या अंडरपासमध्ये पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आणि त्यात साचलेल्या चिखलमय पाण्यामुळे वाहनचालकांसह विद्यार्थ्यांना रोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हा ‘शॉर्टकट’ आता नागरिकांसाठी ‘त्रासकट’ बनल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

या परिसरात अनेक शैक्षणिक संस्था असल्याने दररोज हजारो विद्यार्थी या मार्गाचा वापर करतात. चांगू काना ठाकूर महाविद्यालयासह शाळा, महाविद्यालये आणि विधी शाखेच्या विद्यार्थ्यांची सकाळ-संध्याकाळ या मार्गावर मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांना वेळेत शैक्षणिक संस्थांमध्ये पोहोचणेही कठीण झाले आहे.

अंडरपासमधील खड्ड्यांची खोली वाढल्याने चारचाकी वाहनांना मोठे धक्के बसत असून, वाहनांचे नुकसान होत आहे. दुचाकीस्वारांना तर अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे त्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे. खड्ड्यांतून वाहन गेल्यानंतर बसणाऱ्या जोरदार धक्क्यांमुळे प्रवाशांना कंबरदुखी व पाठीच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच खड्ड्यांतील चिखलमय पाणी वाहनांमुळे उडून विद्यार्थ्यांचे कपडे खराब होत असल्याने त्यांचीही मोठी गैरसोय होत आहे.

स्थानिक नागरिक दीपक यांनी या परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनांचे नुकसान होतेच; मात्र त्याहून गंभीर बाब म्हणजे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात पाण्याखाली खड्डे दिसत नसल्याने अपघाताची भीती कायम असते,” असे त्यांनी सांगितले. दरम्यान, चांगू काना ठाकूर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही प्रशासनाकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. “आम्हाला दररोज याच मार्गाने महाविद्यालयात जावे लागते. खड्ड्यांमुळे होणाऱ्या जोरदार धक्क्यांचा आरोग्यावर परिणाम होत आहे. हा कोणत्याही राजकारणाचा विषय नसून आमच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न आहे. प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवून मार्ग सुरक्षित करावा,” अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. पनवेल आणि खांदा वसाहतीला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या अंडरपासची तातडीने डागडुजी करून खड्डे बुजवावेत आणि पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था करावी, अशी आग्रही मागणी नागरिकांकडून होत आहे. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित प्रशासनाने जागे होऊन या मार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा नागरिक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version