| नवी मुंबई | प्रतिनिधी |
2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाची विद्यार्थिनी श्रावणी अमर थळे हिने शाळेमध्ये प्रथम क्रमांक तर रायगड जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. श्रावणीने दहावीमध्ये 98.80 टक्के गुण प्राप्त केले आहेत. जिल्हा परिषदेच्यावतीने तिचा गुरुवारी (दि. 30) रोजी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी महारुद्र नाले यांच्या हस्ते शाळेमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी श्रावणीला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
श्रावणी ही अलिबाग तालुक्यातील पंतनगर येथील रहिवासी आहे. आईवडील नोकरीनिमित्त पनवेल येथे स्थायिक असल्याने तिने दहावीपर्यंतचे शिक्षण सीकेटी विद्यालयातून पूर्ण केले आहे. तिची आईसुद्धा शिक्षिका आहे. श्रावणी ही शालेय जीवनात अतिशय मनमिळाऊ, शांत, विनम्र तसेच अभ्यासाबरोबरच इतरही अनेक उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यायची. तिने आतापर्यंत अनेक उपक्रमांत सहभाग होऊन यशस्वीरित्या बक्षिसे पटकावली आहे. श्रावणी ही भरतनाट्यम् नृत्यकलेत निपुण आहे. रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने तिला गौरविण्यात आल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी अभिमान व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी पनवेल पंचायत समितीच्या प्रतिमा म्हात्रे, सीकेटी विद्यालयाचे प्राचार्य कैलास सत्रे, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पत्रकार भरतकुमार कांबळे यांच्यासह पनवेल तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते.