| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ ग्रामपंचायत कार्यालयापासून 100 मीटर अंतरावर स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या पुलावरून मेलेल्या कोंबड्या आणि सडलेले मांस टाकले जात आहेत. त्याची दुर्गंधी स्मशानभूमीच्या बाजूने ये-जा करणाऱ्यांना सहन करावी लागत आहे. सध्या कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याने उरण तालुक्यात चिकन विक्री बंद ठेवण्यात आली होती. त्या धर्तीवर नेरळ मधील चिकन व्यवसायिकांनी मेलेल्या कोंबड्या आणि त्यांचे सडलेले साहित्य स्मशानभूमीजवळ टाकल्या जात आहे.
कल्याण-कर्जत रस्त्याच्या एका बाजूला स्मशानभूमी तर दुसऱ्या बाजूला जेमतेम 100 मीटर अंतरावर नेरळ ग्रामपंचायत कार्यालय आहे. तरीदेखील स्मशानभूमी लगतच्या नाल्यात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून मृत कोंबड्या आणि सडलेले मांस टाकण्यात येत आहेत. स्मशानभूमी रस्त्याने ये-जा करणाऱ्या रहिवाशांना दुर्गंधीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यात स्मशानभुमीत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांना देखील असाच त्रास सहन करावा लागत आहे. सध्या रायगड जिल्ह्यात बर्ड फ्लू रोगाची लागण बॉयलर कोंबड्यांना झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासननाने अशा कोंबड्यांना जमिनीत खड्डा खोदून गाडून टाकाव्यात, असे निर्देश दिले आहेत. मात्र, तरी देखील स्मशानभूमी परिसरात दिवसाढवळ्या सडलेल्या आणि मेलेल्या कोंबड्या टाकण्यात येत असताना कोणत्याही प्रकारची कारवाई नेरळ ग्रामपंचायतीकडून करताना दिसत नाही. त्यामुळे, नेरळ ग्रामपंचायतीतील प्रशासकीय राजवट जनतेच्या मुळावर पडत असल्याची चर्चा येथील रहिवासी करत आहेत.
सिसिटीव्ही कॅमेरे मुतावस्थेत
नेरळ ग्रामपंचायतीचे त्या ठिकाणी कचरा टाकू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र, ते सर्व कॅमेरे हे केवळ दिखाऊपणाचे लक्षण आहे. त्या कॅमेऱ्यांची स्थिती मृत अवस्थेतील असून त्यांच्याकडे अनेक वर्षे कोणी पाहिले नाही, अशी झाली आहे. दुसरीकड़े त्या रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येकाला सडलेल्या बॉयलर कोंबडींच्या दुर्गंधीचा त्रास दररोज होत आहे. तरी देखील ग्रामपंचायतीतीतल प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
स्मशानभूमी जवळ कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये म्हणून मोहाची वाडी ग्रामस्थांची सतत मागणी राहिली आहे. ग्रामस्थांना त्या पुलावरून जाताना नाकावर रुमाल लावून जावे लागते. ग्रामपंचायतीचे तेथे कॅमेरे आहेत. मात्र, ते बंद असून त्यांच्या दुरुस्तीकडे पाहायला प्रशासकांना वेळ नाही. सध्याची प्रशासकीय राजवट नेरळ ग्रामस्थांना त्रासाची ठरत असून आम्ही पूर्वी ग्रामपंचायत सदस्यांना फोन केला तरी कचरा उचलायला माणसे यायची. आता प्रशासकांना गावात कुठे दुर्गंधी पसरली आहे याचे काही देणेघेणे दिसत नाही.
गोरख शेप, ग्रामस्थ आणि मानवाधिकार कार्यकर्ता
आम्ही तात्काळ तेथे जाऊन पाहणी करू. तसेच, जी कोणी व्यक्ती कचरा तसेच सडलेले मांस टाकताना आढळेल तिच्यावर कारवाई करू. आम्ही लक्ष ठेवून कारवाई करू शकतो आणि बॉयलर कोंबड्यांबाबत पत्रक काढून अशा मेलेल्या कोंबड्या जमिनीत गाडून टाकण्याचे निर्देश देऊ.
सुजित धनगर, प्रशासक, नेरळ ग्रामपंचायत