वाडगाव जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन
| अलिबाग | प्रतिनिधी |
शालेय शिक्षण पुर्ण झाल्यावर प्रत्येकजण आपआपल्या वाटेकडे गेले. परंतु, सोशल मिडीयाच्या माध्यमातून 30 वर्षांनी वाडगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थी एकवटले. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने माजी विद्यार्थी एकत्र आल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद निर्माण झाला होता. यावेळी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
प्राथमिक शाळेचे जीवन संपल्यावर काही विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी गेले. काही विद्यार्थ्यांनी अर्धवट शिक्षण सोडत घरातील जबाबदारी सांभाळली. काहीजण मुंबई व इतर ठिकाणी नोकरी व शिक्षणासाठी गेले. त्यामुळे या माजी विद्यार्थ्यांचा कित्येक वर्ष संपर्क तुटला होता. वाडगाव येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतील 1995 मध्ये शिकणारे माजी विद्यार्थी सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्र आले. विखूरलेल्या मित्र मैत्रिणींना एका व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे काम करण्यात आले. अखेर त्यांनी प्रत्यक्ष भेटण्याचा निर्णय घेतला. वाडगाव शाळेतच स्नेहसंमेलन करून एकत्र येण्याची वेळ व तारीख ठरली आणि सर्व विद्यार्थी एकत्र आले.
स्नेहसंमेलनाच्या या कार्यक्रमासाठी 1995-1996 सालच्या बॅचचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. अध्यापन करणारे गुरूवर्य यांचीदेखील उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन दिपक धावडे व किशोर पाटील यांनी अमित ठाकूर, रविंद्र सुतार, संतोष गायकवाड, अतिष सुतार, जयेंद्र लखिमले, दत्ताराम थळे, भास्कर आग्री, विरेंद्र टोपले, कविंद्र थळे, मधुकर पाटील यांच्या सहकार्याने झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष सहयोजक जयेश गायकवाड याने केले होते. यावेळी जयेश गायकवाड, प्रमिला बोले आदींनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. गुरूजनांनी मेहनत घेतल्याने आज आम्ही एवढ्या उंचीवर आहोत अशी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांकडून अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील मुलांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. जयेश गायकवाड याने सर्व शिक्षकांचे आभार मानून असे कार्यक्रम पुन्हा करण्याचे आश्वासन देऊन कार्यक्रमाची सांगता केली.
अनेकांच्या उपस्थितींने स्नेहसंमेलनाला उत्साह
शिक्षकांमध्ये कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सीमा पाटील उपस्थित होत्या. वाडगाव जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सुगंधा पाटील, तसेच नितीन पाटील, प्रशांत घरत, चंद्रकांत काटकर, तसेच अंगणवाडीच्या शिक्षिका सुजाता पाटील, विद्यार्थीनींमध्ये राजश्री गीजे, रंजना कानसे, प्रमिला बोले, शिल्पा लखिमले, अर्चना म्हात्रे, वैशाली म्हात्रे, सुशीला लाखण, योगिता उदेक, सारिका मोरे, शामल म्हात्रे, कविता भगत, निलिमा म्हात्रे, निलिमा भगत, वैजयंती म्हात्रे, सुरेखा भगत, रंजिता कोंडे, प्रतिभा सुतार आदी उपस्थित होते. अनेकांच्या उपस्थितीने स्नेहसंमेलनाला एक वेगळा उत्साह निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.