| तळा | प्रतिनिधी |
तळा बसस्थानकाशेजारी तळा नगरपंचायतीचे जवळपास अकरा गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. या गाळ्यांच्या समोर लागूनच गटार वाहत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या गटाराची दुरुस्ती तसेच, वेळच्या वेळी साफसफाई देखील केली गेली नाही. परिणामी या गटाराची दुरवस्था झाली असून हे गटार पूर्णपणे तुंबल्याने गटारातील सर्व सांडपाणी गाळेधारकांसमोर साचून पुढे रस्त्यावर वाहत आहे. या गाळे धारकांकडे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना या सांडपाण्यातून यावे लागत असून या सांडपाण्यामुळे आजारांना निमंत्रण मिळत आहे. याकडे तळा नगरपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे हे गटार पुर्णतः नव्याने बांधण्याची आवश्यकता आहे. नगरपंचायतीचे गाळे असल्याने त्रास होत असतानाही गाळेधारक नगरपंचायत प्रशासनाविरोधात आवाज उठवताना कचरत आहेत. याबाबत तळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांच्याशी संपर्क साधला असता हे गटार नव्याने बांधण्यास मंजुरी मिळाली असून येत्या रविवारपासून कामाला सुरुवात होईल, अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.