नेरळ- कळंब राज्यमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील माथेरान-नेरळ-कळंब राज्यमार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम रखडल्याने नेरळ परिसरातील वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दोन महिन्यांपूर्वी काँक्रीटीकरणासाठी खोदण्यात आलेला रस्ता अद्यापही पूर्ववत करण्यात आलेला नसल्याने पावसाळ्यात हा मार्ग धोकादायक बनला आहे. विशेष म्हणजे हुतात्मा हिराजी पाटील नगरसमोरील रस्ता पावसाच्या पाण्याने अक्षरशः नदीचे स्वरूप धारण करत असून वाहतूक विस्कळीत होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एमआरआयडीसीमार्फत माथेरान-नेरळ-कळंब राज्यमार्गाचे काँक्रीटीकरण व रस्त्याच्या दुतर्फा संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरू आहे. धामोते ते कोदीवले या भागातील काँक्रीटीकरण पूर्ण झाले असले, तरी नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील रस्ता काँक्रीटीकरणासाठी खोदून ठेवण्यात आला आणि त्यानंतर काम थांबले.

गेल्या दोन महिन्यांपासून खोदलेला रस्ता तसाच असल्याने पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत. सुमारे 50 फूट लांबीचा खड्डा तयार झाल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. नेरळ रेल्वे फाटकापर्यंतचा रस्ता अनेक ठिकाणी खड्डेमय झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून, प्रवाशांचा वेळही वाया जात आहे.

काँक्रीटीकरणाचे काम रखडल्याने वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. खोदलेला रस्ता वेळेत बुजवला गेला नसल्याने पावसाचे पाणी साचून परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. ठेकेदाराच्या नियोजनशून्य कामकाजामुळे नागरिक आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version