पालदाड पुलाला खड्ड्यांचे ग्रहण


पाण्याची डबकी साठल्याने नागरीकांवर जलाभिषेक

। खांब-रोहे । वार्ताहर ।
खांब-पालदाड मार्गाला जोडणार्‍या मोठ्या पालदाड पुलावर सुरूवातीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पावसाच्या पाण्याची डबकी साठल्यामुळे त्याचा नाहक त्रास वाहनचालक व प्रवासीवर्गाला सहन करावा लागत आहे.

गेल्या दोन-तीन वर्षापासून पुलावरील डांबरीकरण हळूहळू कमी झाल्याने तसेच येथे याबाबत कोणतीही उपाययोजना न केल्याने अखेर पडलेल्या छोट्या छोट्या खड्ड्यांनी सद्यस्थितीत उग्ररुप घेऊन त्यांचे फार मोठ्या खड्ड्यांमध्ये रूपांतर झाले आहे. याशिवाय खड्ड्यातून बाहेर आलेले दगडगोटे, वाळू, बारीक खडीही अस्ताव्यस्त पसरलेली आहे.त्याचप्रमाणे येथे मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याने येथून मार्गक्रमण करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाहनांच्या टायर्समधून पाणी उडत असल्याने जलाभिषेकही होताना दिसत आहे. तर येथील तुंबलेल्या डबक्यांबाबत संबंधित प्रशासन यंत्रणेने यावर त्वरीत उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे दैनंदिन प्रवास करणार्‍या प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.

Exit mobile version