गॅसअभावी उरणची ‌‘पॉवर‌’ डाउन

672 मेगावॉटची क्षमता; प्रत्यक्ष निर्मिती 250-300 मेगावॉटवरच
850 मेगावॉटचा विस्तारही कागदावर

| उरण | प्रतिनिधी |

उरणचा वायू विद्युत प्रकल्प राज्याच्या ऊर्जानिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावण्याची क्षमता असतानाही अपुऱ्या गॅसपुरवठ्यामुळे त्याची वीजनिर्मिती मोठ्या प्रमाणात घटली आहे. 1985 मध्ये जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारे उभारलेल्या या केंद्रातील सहा संचांची एकूण क्षमता 672 मेगावॉट आहे. मात्र, आवश्यक गॅस उपलब्ध होत नसल्याने या क्षमतेचा पूर्ण वापर होत नसल्याची बाब समोर आली आहे.

672 मेगावॉट वीजनिर्मितीसाठी दररोज 3.5 एमएमएससीएमडी गॅस आवश्यक असताना सुरुवातीपासूनच केवळ 1.05 ते 2.5 एमएमएससीएमडीपर्यंत गॅसपुरवठा होत असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत परिस्थिती आणखी गंभीर झाली असून सहापैकी तीन संच बंद पडले आहेत. त्यामुळे सध्या केंद्रातून दररोज केवळ 250 ते 300 मेगावॉट वीज निर्माण होत आहे.

महाजनकोचे जनसंपर्क अधिकारी संतोष पुरोहित यांच्या माहितीनुसार, आवश्यक 3.5 एमएमएससीएमडी गॅस उपलब्ध झाल्यास उरण केंद्रातून सुमारे 650 मेगावॉट वीजनिर्मिती करता येऊ शकते. दरम्यान, उरणच्या विद्यमान प्रकल्पाला जोडून अतिरिक्त 850 मेगावॉट क्षमतेचा विस्तार प्रकल्प उभारण्यास महानिर्मितीच्या संचालक मंडळाने चार-पाच वर्षांपूर्वी मंजुरी दिली. मात्र, या प्रकल्पाला गॅसपुरवठ्यासाठी केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाची मंजुरी अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे हा प्रकल्पही रखडला आहे.

राज्यातील विजेची मागणी सध्या 28,179 मेगावॉट असून आगामी काळात ती 30 हजार मेगावॉटपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उरणला गॅस आणि विस्ताराला मंजुरी कधी? हा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे.

घोषणांचा पाऊस, गॅसचा दुष्काळ!
उरण वायू विद्युत केंद्राला पुरेसा गॅसपुरवठा करण्यासह प्रकल्पाच्या विस्ताराच्या अनेकदा घोषणा करण्यात आल्या. आतापर्यंत विविध ऊर्जामंत्र्यांनी उरणला भेट देऊन प्रकल्पवाढीची आश्वासने दिली; मात्र प्रत्यक्षात या घोषणांची अंमलबजावणी झालेली नाही. राज्यात सध्या दररोज सुमारे 28,179 मेगावॉट विजेची मागणी आहे. त्यापैकी महाजनकोकडून 7,858 मेगावॉट वीजपुरवठा केला जात असून, उरण वायू विद्युत केंद्राचा वाटा सुमारे 270 मेगावॉट आहे. अन्य शासकीय आउटसोर्सिंगमधून 336 मेगावॉट वीज उपलब्ध होत आहे.ऑक्टोबरनंतर उन्हाळ्यात राज्याची विजेची मागणी 30 हजार मेगावॉटपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उरण केंद्राला पुरेसा गॅसपुरवठा करून विद्यमान क्षमता पूर्ण क्षमतेने वापरणे आणि रखडलेला 850 मेगावॉटचा विस्तार प्रकल्प मार्गी लावणे गरजेचे आहे. या दोन्ही गोष्टी झाल्यास राज्यातील संभाव्य वीजतूट भरून काढण्यास उरण प्रकल्पाचा मोठा हातभार लागू शकतो.
Exit mobile version