वीज कर्मचार्‍यांना दमदाटी

। कल्याण । प्रतिनिधी

वीजचोरीसाठी वापरत असलेला आकडा (हूक) काढल्याच्या रागातून वरिष्ठ तंत्रज्ञ व त्यांच्या दोन सहकार्‍याना शिविगाळ, दमदाटी करणार्‍या आरोपीविरुद्ध वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडा तालुक्यातील गौरापूर येथे शनिवारी (23 एप्रिल) ही घटना घडली.भाई महादू खंडागळे (रा. गौरापूर, ता. वाडा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. खानिवली शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ संदीप पाटील हे त्यांचे सहकारी तंत्रज्ञ सचिन जाधव तसेच बाह्यस्त्रोत कर्मचारी अनिल गांगड यांच्यासह गौरापूर येथे वीज चोरांवरिुद्ध कारवाई करत होते. वीज चोरीसाठी लघुदाब वाहिनीवर टाकलेले आकडे काढत असताना आरोपीने वरिष्ठ तंत्रज्ञ पाटील व त्यांच्या सहकार्‍यांना मारण्याच्या उद्देशाने अंगावर धावून जात शिविगाळ व दमदाटी केली व काम करण्यापासून त्यांना रोखले. वरिष्ठ तंत्रज्ञ पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी भाई खंडागळे याच्या विरूद्ध वाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.

Exit mobile version