| अलिबाग | प्रतिनिधी |
राजकीय, सामाजिक आदी क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारे प्रदीप ओव्हाळ यांची रिपब्लिकन सेनेच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय नेते आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन ओव्हाळ यांचा सन्मान करण्यात आला. मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे हा कार्यक्रम पार पडला.
प्रदीप ओव्हाळ हे अलिबाग तालुक्यातील कुरूळ येथील रहिवासी आहेत. त्यांनी अगदी कमी वयातच राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. वंचित घटकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी आरोग्य, शिक्षण अशा विविध विभागांत पाठपुरावा केला. तळागाळातील घटकाचा विकास साधण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांच्या कार्याची दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी, त्यानंतर अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी खंबीरपणे सांभाळून आपल्या पदाचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केला. भारिप बहुजन महासंघ या पक्षाचे जिल्ह्याचे नेतृत्वदेखील त्यांनी केले. भारिप बहुजन महासंघाकडून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद उमेदवार देऊन बहुमत मिळवले होते.
ग्रामीण भागातील तरुणांना एकत्र आणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. प्रदीप ओव्हाळ यांच्याकडे रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षाचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी दिलेली जबाबदारी विश्वासाने पार पाडून पक्षवाढीसाठी मेहनत घेणार, असा विश्वास प्रदीप ओवाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला.
रिपब्लिकन सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रदीप ओव्हाळ
