आगरी समाजातील महिला पायलट होण्याचा मान
| उरण | वार्ताहर |
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची पुतणी प्राप्ती राज ठाकूर या वयाच्या 22व्या वर्षी कमर्शियल पायलट झाल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील आगरी समाजातील पहिली महिला पायलट होण्याचा मान प्राप्ती ठाकूर यांनी मिळविला आहे.
मूळच्या उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील आणि सध्या नेरूळ (नवी मुंबई) येथे वास्तव्यास असलेल्या प्राप्ती ठाकूर यांनी 2019 मध्ये बारामती येथील कार्व्हर एव्हिएशन अकॅडमीमध्ये अॅडमिशन घेतले. 2020 पासून त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. 2024मध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर कमर्शियल पायलट (कॅप्टन) म्हणून त्यांना पदवी प्राप्त झाली. त्यांनी एकूण 207 तास उड्डाण केले आहे. त्यांनी प्रशिक्षणाच्या वेळी सोलो उड्डाण 600 कि.मी. बारामती ते लातूर, लातूर ते कराड, कराड ते बारामती (6000 फूट उंच) केले. रविवारी (दि. 11) बारामती येथे त्यांचा थ्री स्ट्रीप्स व इप्युलेट समारंभ होणार आहे.
प्राप्ती ठाकूर यांच्या यशाबद्दल त्यांचे कुटुंबीय माजी खासदार रामशेठ ठाकूर (काका), भरत ठाकूर व रजनी ठाकूर (आईवडील), माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत (आत्या), दीपक ठाकूर व योगिता ठाकूर (सासू सासरे), राज ठाकूर (पती), मानस ठाकूर (दीर) आदींसह मित्रपरिवाराने अभिनंदन, कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कमर्शियल पायलट एक असा पायलट असतो जो सर्व प्रकारचे एअरक्राफ्ट पॅसेंजर जेट, कार्गो, चार्टर्ड विमान इत्यादी उडवतो. या प्रकारच्या पायलटच्या खांद्यावर हजारो प्रवाशांची जबाबदारी असते. कमर्शियल पायलट इंडिगो, एअर इंडिया यासारख्या एअर लाइन्स कंपनीमध्ये जॉब मिळवू शकतो.
देशाची सेवा करण्याची इच्छा प्राप्ती ठाकूर यांनी आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या परिवाराला दिले. भविषयात देशाची सेवा करण्याची इच्छा प्राप्तीने व्यक्त केली.