प्रशांत नाईक यांची तत्परता; आगारात प्रवाशांच्या आरोग्यासाठी यंत्रणा केली उभी

प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांकडून कौतुक

| अलिबाग | प्रतिनिधी |

मुसळधार पावसानंतर अलिबाग एसटी आगारात साचलेल्या चिखल, गाळ आणि कचऱ्यामुळे प्रवासी तसेच एसटी कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. ही समस्या समजताच माजी नगराध्यक्ष तथा अलिबाग नगर परिषदेचे विद्यमान वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी तातडीने पुढाकार घेत स्वखर्चाने जेसीबी उपलब्ध करून आगार परिसराची स्वच्छता करून घेतली. त्यांच्या या तत्परतेमुळे आगार पुन्हा स्वच्छ व सुरक्षित झाल्याने प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले.

अलिबाग एसटी आगार हे रायगड जिल्ह्यातील प्रमुख वाहतूक केंद्र असून दररोज हजारो प्रवासी या आगारातून प्रवास करतात. अलीकडील पावसामुळे आगार परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ, चिखल आणि कचरा साचल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अस्वच्छतेमुळे आरोग्याच्या दृष्टीनेही चिंता निर्माण झाली होती.

आगारातील वाहन निरीक्षक दिलीप पालवणकर आणि कर्मचाऱ्यांनी ही बाब प्रशांत नाईक यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी विलंब न लावता परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर तातडीने जेसीबी यंत्रणा उपलब्ध करून आगार परिसरातील साचलेला गाळ आणि चिखल हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. काही तासांतच परिसराची स्वच्छता पूर्ण झाल्याने आगाराचे रूप पालटले.

या कामाबद्दल वाहन निरीक्षक दिलीप पालवणकर, आगार प्रशासन आणि एसटी कर्मचाऱ्यांनी प्रशांत नाईक यांचे आभार मानत, सार्वजनिक प्रश्नांवर त्यांनी दाखविलेली तत्परता आणि संवेदनशीलता कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी लोकप्रतिनिधींनी अशाच प्रकारे पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही अनेकांनी नमूद केले.

Exit mobile version