जिल्ह्यातील पहिला आयएएस बनण्याचा मान
अलिबागसह शहाबाजच्या नावलौकिकात भर
अलिबाग । सायली पाटील ।
अलिबाग तालुक्यातील शहाबाज येथील चौकीचा पाडा या गावातील प्रतीक चंद्रशेखर जुईकर हा रायगडातील पहिला वहिला आयएएस झाला आहे. देशातील महत्त्वाची यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीचा अडथळा पार करीत संपूर्ण देशात त्याने 177 वा क्रमांक मिळविला आहे.
रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षक चंद्रशेखर जुईकर यांचा सुपुत्र प्रतीक जुईकर यांनी देशातील महत्त्वाची परीक्षा समजल्या जाणार्या यूपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवित रायगड जिल्ह्यातील पहिला यूपीएससी फायनालिस्ट ठरला आहे. या यशाबद्दल प्रतीकवर जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. असं म्हणतात, की वेडी माणसंच इतिहास घडवतात. आणि, हेच अभ्यासाचं वेडेपण घेऊन त्याने यूपीएससीची परीक्षा पास करण्याची जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम या सर्व गोष्टींची सांगड घालत आयएएस बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
प्रतीक हा पहिल्यापासूनच अत्यंत हुशार आणि तल्लख बुद्धीचा होता. प्रचंड अभ्यास करणे, खूप वाचन करणे, हे त्याचे छंद. तसेच तो इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत संपूर्ण कर्जत तालुक्यात पहिला आला होता. पुढे त्याने मध्यप्रदेशातील भोपाळ येथे आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून तो बीटेक झाला. त्यानंतर काही काळ नोकरी करू लागला. पण, त्याचे तेथील मित्र हे आयआयटी करुन यूपीएससीची तयारी करत होते. तेव्हा प्रतीकने त्यांच्यापासून प्रेरणा घेत यूपीएससीच्या अभ्यासाला सुरूवात केली. तसेच त्याच्या आई-वडिलांचीदेखील प्रतीकने आयएएस व्हावे, अशीच इच्छा होती. प्रतीकने त्याच्या आईवडिलांची इच्छा पूर्ण करून संपूर्ण गावकर्यांची व अलिबागकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. रायगडातील पहिला वहिला आयएएस बनून त्याने सर्वांसमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे.
थेट आयएएस झालेला जिल्ह्यातील पहिला म्हणून प्रतीक जुईकर यांची नोंद झाली आहे. सर्वांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट असून, संपूर्ण रायगड जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शैक्षणिक वाटचाल..
दहावी, बारावीत कर्जत तालुक्यातून प्रथम
मध्यप्रदेशातील आयआयटीमधून बीटेकची पदवी
काही काळ चांगल्या कंपनीत नोकरी
मित्रांच्या प्रेरणेतून यूपीएससीची तयारी