| रसायनी | प्रतिनिधी |
वासांबे-मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायतीकडून मान्सूनपूर्व नाले, ड्रेनेज, मोरी, तलाव, घाट यांच्या स्वच्छतेच्या कामांना मोहोपाडामधून सुरूवात झाली आहे. मे अखेरपर्यंत मोहोपाडासह ग्रामपंचायत परिसरातीलही मान्सूनपूर्व कामे पुर्ण होणार असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी वैभव पाटील व सरपंच उमा मुंढे यांनी बोलताना सांगितले.
मोहोपाडा विभागातील मान्सूनपुर्व कामांसाठी ग्रामपंचायत सदस्या रसिका खराडे, सदस्या प्रतिक्षा राऊत, सदस्य आकाश जुईंकर अधिक लक्ष घालत आहेत. पावसाळ्यापुर्वीची कामे पुर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या नियमित कर्मचाऱ्यांच्या संख्येव्यतिरिक्त कर्मचारी देखील ठेक्यावरही साफसफाईच्या कामासाठी लावण्यात आले आहेत. दरम्यान, मोहोपाडा गावासह येथील बाजारपेठ, आणि तलावाच्या चार घाटांची स्वच्छता करण्यात येऊन प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, थर्माकोल, जागोजागी असलेले गवत, निर्माल्य इत्यादी काढून तलाव स्वच्छ करण्यात आला आहे. तसेच पंचशिल नगर, मोहोपाडा वाडी, बैठक हॉलजवळील वसाहतीमधील ड्रेनेज आणि मोरीच्या स्वच्छतेचे काम करण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावातील मान्सूनपूर्व स्वच्छतेची कामे मे अखेर पुर्ण होतील, असा विश्वास स्वच्छता सुपरवायझर संजय पाटील यांनी व्यक्त केला.






