व्यावसायिकांकडे पॅकिंगच्या कामाची लगबग सुरू
| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
दिवाळी म्हटली की घराघरांतून दरवळणारा चकली, चिवडा, लाडू, करंजी आणि शंकरपाळ्यांचा सुगंध डोळ्यांसमोर येतो. मात्र, बदलती जीवनशैली, नोकरी-व्यवसायाची धावपळ आणि घरातील वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे दिवाळीचा फराळ घरी बनवण्यासाठी महिलांना पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे आता अनेक कुटुंबांकडून रेडिमेड फराळाला पसंती दिली जात आहे. पनवेल आणि खांदा कॉलनी परिसरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फराळाच्या ऑर्डर आणि पॅकिंगच्या कामाला वेग आला आहे.
पूर्वी दिवाळीच्या काही दिवस आधी घराघरांत फराळ बनवण्याची लगबग सुरू होत असे. महिलांचे एकत्र येऊन चकल्या पाडणे, करंज्या भरणे, लाडू वळणे आणि चिवडा तयार करणे, हा दिवाळीच्या तयारीतील महत्त्वाचा भाग होता. मात्र, आज अनेक महिला नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत असल्याने पारंपरिक पद्धतीने सर्व पदार्थ घरी बनवणे शक्य होत नाही. त्यामुळे तयार फराळ खरेदी करणे हा अनेक कुटुंबांसाठी सोयीचा पर्याय बनला आहे.
यंदा जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडत आहे. अशा परिस्थितीत दिवाळीचा सण आनंदात साजरा करताना खर्चाचा ताळमेळ साधण्याचे आव्हान कुटुंबांसमोर आहे. फराळासाठी लागणारे तेल, तूप, साखर, बेसन, मैदा, रवा आणि इतर साहित्य खरेदी करण्यापासून ते फराळ बनवण्यासाठी लागणाऱ्या वेळेपर्यंत अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळे घरगुती फराळ बनवण्याऐवजी गरजेनुसार रेडिमेड फराळ मागवण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.
दिवाळीत नातेवाईक, मित्रमंडळी आणि शेजाऱ्यांची घरी ये-जा सुरू असते. पाहुण्यांना चहा-पाण्यासोबत फराळ देण्याची परंपरा आजही कायम आहे. मात्र, प्रत्येक पदार्थ घरी बनवणे शक्य नसल्याने अनेक कुटुंबे चकली, चिवडा, लाडू, करंजी आणि शंकरपाळ्यांचे तयार पॅक मागवत आहेत. आपल्या बजेटनुसार फराळाचे पॅक निवडून पाहुण्यांचे स्वागत करण्यावर भर दिला जात आहे.
दिवाळीच्यानिमित्ताने कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्याची परंपरा अनेक कंपन्यांमध्ये आहे. मिठाईसोबत किंवा मिठाईऐवजी फराळाचे आकर्षक पॅक देण्याचा पर्याय काही कंपन्यांकडून निवडला जातो. कर्मचाऱ्यांना घरगुती चवीचा फराळ भेट म्हणून देता यावा, यासाठी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिल्या जातात. त्यामुळे फराळ तयार करणाऱ्या व्यावसायिकांकडे पॅकिंगच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. काही ग्राहक मर्यादित प्रमाणात फराळ खरेदी करत आहेत, तर काही जण पाहुण्यांची संख्या आणि बजेट लक्षात घेऊन मोठ्या पॅकना पसंती देत आहेत. एकीकडे महागाईचे आव्हान, तर दुसरीकडे धावपळीचे जीवन अशा परिस्थितीत रेडिमेड फराळाने अनेक कुटुंबांना दिलासा दिला आहे. घरगुती फराळाची पारंपरिक चव आणि दिवाळीचा आनंद कायम ठेवत, वेळेची बचत करण्यासाठी नागरिक तयार फराळाकडे वळत आहेत. त्यामुळे दिवाळी जवळ येत असताना पनवेल परिसरात फराळाच्या पॅकिंगच्या कामाला वेग आला असून, बाजारपेठेत सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरवाढीमुळे ग्राहकांना अतिरिक्त खर्च
यंदा रेडिमेड फराळाच्या दरात सुमारे 15 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ग्राहकांना फराळ खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात. तरीही वेळेची बचत, पदार्थांची विविधता आणि तयार पॅकची सोय यामुळे रेडिमेड फराळाची मागणी कायम आहे.
