पावसाळ्याची बेगमी अन् तृप्तीची शिदोरी
पापड, कुरडया आणि मसाल्यांची लगबग
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
भारतीय खाद्यसंस्कृतीत चवीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कडक उन्हाचा तडाखा वाढू लागला की, गृहिणींना वेध लागतात ते पावसाळ्याच्या बेगमीचे. पावसाळ्यातील चार-पाच महिने तोंडी लावण्यासाठी आणि जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी उन्हाळ्यात करण्यात येणाऱ्या वाळवण आणि मसाल्यांची जंत्रीच मोठी आहे. रायगड जिल्ह्यात सध्या घराघरांतून पापड, कुरडया, सांडगे आणि विविध मसाल्यांचा सुवास दरवळत असून, ही पारंपरिक वाळवण व खाद्य संस्कृती आजही तितक्याच उत्साहात जोपासली जात असल्याचे चित्र दिसत आहे.
पावसाळ्यात बाहेर पाऊस कोसळत असताना घरात गरमागरम जेवणासोबत उन्हाळ्यात तयार केलेले चटपटीत पदार्थ खाण्याची मजा काही औरच असते. याच पावसाळ्याच्या बेगमीसाठी सध्या संपूर्ण जिल्ह्यात लगबग सुरू आहे. त्यात प्रामुख्याने तांदळाचे पापड, गव्हाच्या चिकाच्या कुरडया, तांदळाच्या चिकोड्या, बटाटा वेफर्स, शेवया, फेण्या आणि सांडगे यांसारखे पदार्थ वैयक्तिक तसेच सामूहिकरीत्या बनवले जात आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही ही वाळवण संस्कृती केवळ खाद्यपदार्थांपुरती मर्यादित नसून, ती सामाजिक सलोख्याचे माध्यम बनली आहे. एखादीच्या घरी पापड किंवा कुरडया करायच्या असल्यास गल्लीतील किंवा गावातील महिला विनाशुल्क आनंदाने मदतीला धावून जातात. या निमित्ताने महिलांचे एकत्र येणे, गप्पांच्या मैफिली आणि गाणी गुणगुणत चाललेले काम यामुळे श्रमाचा परिहार होतो. ज्या घरात हे पदार्थ बनवले जातात, तिथे महिलांसाठी चहा-नाश्त्याची खास सोय असते. घरातील बच्चेकंपनीदेखील सांडगे घालणे किंवा पापड वाळत घालण्याच्या कामात उत्साहाने सहभाग घेताना दिसते. तयार झालेले हे पदार्थ केवळ स्वतःसाठी न ठेवता नातेवाईक आणि शेजाऱ्यांना चवीसाठी देण्याची हौस आजही जपली जात आहे.
आंबोशी अन् सुकी मच्छीची साठवण
कोकणची ओळख असलेल्या कोकम, आंबा व कैरीवर या दिवसांत प्रक्रिया केली जाते. घरांच्या अंगणात, छतावर किंवा कौलांवर कोकम तसेच कापलेल्या आंब्याच्या फोडी आंबोशी बनविण्यासाठी सुकवल्या जातात. फणस पोळी, आंबा पोळी, सांडगी मिरची आणि कोकम सरबत बनवण्यासाठी आगळ साठवण्याची कामे जोमात आहेत. तसेच, पावसाळ्यात ताज्या मासळीची टंचाई भासते, म्हणून या दिवसांत सुकी मच्छी साठवून ठेवण्यावरही भर दिला जात आहे.
अशी केली जाते तयारी
मसालेः विविध प्रकारच्या मिरच्या वाळवून घरगुती पद्धतीचे आगरी-कोळी किंवा कोकणी गरम मसाले तयार करणे.
वाळवण: तांदूळ, गहू, नाचणी आणि उडदाचे विविध प्रकारच्या पापड्या व सांडगे.
लोणची: कैरी, लिंबू आणि करवंदाची चविष्ट लोणची भरणीत मुरत ठेवली जात आहेत.
सरबत: कोकमचे काप करून बरणीत सरबत बनविण्यासाठी ठेवले जातात.
