भेंडखळ गावाने ठेवला समाजासमोर आदर्श
| उरण | दिनेश पवार |
उरण तालुक्यातील भेंडखळ या गावी पूर्वापार चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह जास्तच विशेष आहे. कारण 156 वर्षापूर्वी चालू केलेला हा सप्ताह आजच्या नवीन पिढीने त्याच संस्काराने आणि त्याच पद्धतीने व भक्ती भावनेने चालू ठेवला आहे.
890 सभासदांच्या चार-बाऱ्या अखंड सप्ताहात हरिनामाच्या भजनात आठवडाभर तल्लीन होऊन रंगून जातात. आठवडाभर कुठे एका क्षणालाही मृदुंग कधीही थांबत नाही. सप्ताहचा शेवटचा दिवस म्हणजे जन्माष्टमीचा अत्यंत पारंपरिक पद्धतीने सर्व लोकांच्या उपस्थितीत कृष्ण जन्माष्टमीचा हा सोहळा पार पडतो. सोहळा म्हणजे लोकांसाठी पर्वणीच जणू. त्यानंतर असतो तो गोपाळकाला, म्हणजेच काला. एक अविस्मरणीय डोळ्यांच पारणं फेडणारा सोहळा. गर्दी, उत्साह, ढोलांच्या आवाजावर थिरकणारी तरुणाई, हंडी फोडण्यासाठी उडालेली झुंबड, हंडी फुटल्यानंतर होणारा जल्लोष अवर्णनीय असतो.
1868 साली म्हणजे 156 वर्षांपूर्वी सात-आठ लोकांनी लावलेली हरिनामाची ही वेल आता आभाळा एवढा वटवृक्ष म्हणजे 890 सदस्य झाले आहेत. त्यावेळचे ग्रामस्थ शंकर ठाकूर, भिलू ठाकूर, लक्ष्मण ठाकूर, केशव भोईर, नामदेव घरत, शिवराम ठाकूर, यादव ठाकूर, शंकर भोईर, हरिभाऊ ठाकूर व इतर कडू, भगत, म्हात्रे यांनी 1868 साली सर्वप्रथम हरिनाम सप्ताहाला सुरुवात केली. या सोहळ्यात अगदी लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत अगदी भक्ती भावाने आणि उत्साहाने सामील होतात. तसेच कितीही मद्य पिणारे अथवा मांसाहार करणारे असोत, या सप्ताहाच्या काळात पूर्ण शुद्ध शाकाहारी व सात्विक बनून निर्मळ व पवित्र मनाने हा उत्सव साजरा करतात. खरचं आदर्श घेण्यासारखा आहे.
फार पूर्वीच्या गरिबी, अपुऱ्या सोयी, अस्वच्छता यामुळे पावसाळ्यात हमखास कॉलरापटकी-हायजा अशा अनेक रोगांची साथ येत असे. त्यावेळच्या अनेक संत महापुरुषांनी जनजागृती करून लोकांना स्वच्छतेकडे वळवून रोगराईपासून दूर ठेवले. त्यावेळी पंजाब वरून आलेले धर्म प्रसारक महान संत जीवन मुक्त स्वामी यांनी अनेक गावांना रोगमुक्त करण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्यास प्रयत्न केले. त्यातीलच एक उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील अखंड हरिनाम सप्ताह जो आजतागात 156 वर्षे होऊनही उत्साहाने व भक्तीभावाने सुरू आहे.