मोठ्या आंदोलनाची भीम आर्मीची गर्जना; रस्ता परिषदेतून राज्यव्यापी लढ्याची घोषणा होणार
| वावोशी | प्रतिनिधी |
डोणवत गावात आदिवासी शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या शेतजमिनी असूनही अनेक वर्षांपासून त्यांना स्वतःच्या शेतीत जाण्यास अडथळे येत असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी नामवंत कंपनीच्या व्यवस्थापनाकडे वारंवार निवेदने दिली असली, तरी प्रश्न अद्याप निकाली न निघाल्याने संताप व्यक्त होत आहे.
देशातील शेतकरी स्वतःच्या जमिनीत जाण्यास वंचित राहणे ही अत्यंत दुर्दैवी व शोकांतिका असल्याची भावना व्यक्त करत भीम आर्मी संघटनेने अनेक आंदोलन व निवेदनांद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संघटनेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या चार-पाच दिवसांत शेतकऱ्यांना सोबत घेऊन कोकणात प्रथमच भव्य रस्ता परिषद आयोजित करण्यात येणार असून, त्यातून मोठ्या शेतकरी आंदोलनाची घोषणा केली जाणार आहे. या पत्रकार परिषदेला अशोक कांबळे, दीपक भालेराव, प्रितेश पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश श्याम चव्हाण यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रस्तावित आंदोलनामुळे जिल्ह्यातील वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
