भाजीपाला महागल्याने रायगडकरांना पडला प्रश्न
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ऑक्टोबरपर्यंत अधून मधून सुरुच असलेल्या पावसाच्या धारांमुळे झालेल्या नुकसानामुळे भाजीपाला खराब झाला. त्यामुळे बाजारपेठेत आवक कमी व वाढता वाहतूक खर्च पाहता दामदुप्पट दराने भाजीपाला खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. त्यात, सध्या कोथंबिरीसह टॉमेटो तसेच सर्वच भाज्यांचे दरांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणींच्या बजेटवर परिणाम झाला असून ताटातल्या भाजीसह टॉमेटोच्या वापरावर देखील हात आखडता घेण्याची वेळ आली आहे.
अनेक जिल्ह्यातील ग्रामीण भागातून उत्पादित भाजीपाला कमी येत असल्याने बाहेर जिल्ह्यातून दररोज हजारो क्विंटटल भाजीपाला शहरात येतो. त्यात डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च पाहता भाजीपाला 60 ते 120 रुपये प्रतिकिलोने नागरिकांना खरेदी करावा लागल्याचे वास्तव आहे. 40 टक्के आवक घटली असून पावसामुळे टोमॅटोसह इतर पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे, त्यामुळे भाव वाढले असल्याचे भाजीपाला व्यापारी भगवान परकर यांनी सांगितले. अनेक किरकोळ बाजारात टॉमेटोचे वेगवेगळे दर आहेत. पनवेल येथील बाजारात 80 रुपये किलो टॉमेटो विकला जात आहे तर पेणच्या बाजारात 60 रुपये किंमतीचे टॉमेटो विकले जात आहेत या आधी टॉमेटोची किंमत 40 रुपये किलो होती आता मात्र प्रत्येक किलोमागे 20 ते 40 रुपये जास्तीचे द्यावे लागत आहेत.
पाव किलो भाजी आधी 7 ते 10 रुपये किलो होती पण आता 15 ते 25 रुपये पाव किलो भाजी खरेदी करावी लागत आहे. त्यातच, भाजी वाढावयला टोमॅटो घातले जातात पण ते ही महाग झाले आहेत.
वैशाली पालकर, गृहिणी
भाजीपाल्याचे बाजारातील किलोचे दर
भेंडी 80 रुपये
शिमला मिरची- 60 रुपये
दुधी- 60 रुपये
मिरची- 80 रुपये
कोबी – 60 रुपये
वांगी- 80 ते 100 रुपये
गवार ड्ढ 100 ते 120 रुपये
टोमॅटो – 80 रुपये
पडवळ – 60 रुपये
फ्लॉवर – 60 रुपये
फरसबी – 80 रुपये
मटार – 200
कोथंबिर 50 ते 80 रुपये जुडी






