जिल्ह्यात लेखी परिक्षेला 50 टक्क्यांहून कमी उपस्थिती
81 पदांसाठी 7 हजार 706 उमेदवारांनी दिली परिक्षा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नवीन पोलीस भरती प्रक्रिया अंतर्गत सोमवारी रायगड जिल्ह्यात घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेला पात्र उमेदवारांनी 50 टक्क्यांहून कमी उपस्थिती लावली आहे. पोलिस शिपाई पदांच्या 81 जागांसाठी 9 हजार 531 उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी तब्बल 4 हजार 825 उमेदवारांनी परिक्षेला अनुपस्थिती दाखविला आहे. तर 4 हजार 706 उमेदवारांनी उपस्थित राहून पेपर दिले.
पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 7 पोलिस ठाण्यांतर्गत विविध परिक्षा केंद्रावर नियोजित तारखेनुसार घेण्यात आलेल्या या परिक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता पारदर्शक पध्दतीने पार पडली.
पोलिस भरती लेखी परिक्षेसाठी जिल्ह्यातील अलिबाग, पेण, वडखळ, पोयनाड, कर्जत, रसायनी, खोपोली या सात पोलिस ठाण्यांतर्गत विविध परिक्षा केंद्रावर परिक्षा घेण्यात आली. या दरम्यान परिक्षा केंद्रावर पारदर्शकता ठेवण्यासाठी सीसीटिव्ही, व्हिडीओ कॅमेरे लावण्यात आले होते. प्रत्येक केंद्रावर चार पोलिस अधिकारी आणि 25 कर्मचारी असा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र सध्याच्या काळात बेरोजगारी वाढत असताना या परिक्षेला 50 टक्क्यांहून कमी उमेदवार उपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.