माणगावात औषधाबरोबरच डॉक्टरही सज्ज
| माणगाव | वार्ताहर |
हवामानातील बदलामुळे कधी ऊन, पाऊस यामुळे सतत बदल घडत आहेत. अतिवृष्टी नंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे विविध साथीचे आजार वाढण्याचे धोके संभवतात. तसेच पावसामुळे नद्या, नाले वाहत आहेत. अनेक गावांना विहीर व नदीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जातो. ते पाणी नागरिकांनी गाळून व उकळून प्यावे असे आव्हान सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले असून पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगावर कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. माणगाव तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. तर उपजिल्हा रुग्णालय स्वतंत्र आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या उपचारासाठी याचा मोठा फायदा होतो. माणगाव तालुक्यातील सहा आरोग्य केंद्रात पुरेशा औषधाबरोबरच वैद्यकीय अधिकारी वर्गही पुरेसा आहे. त्यामुळे नागरिकांना सहज उपचार मिळत आहेत.
वेळोवेळी वैयक्तिक व परिसर स्वच्छता करणे, उघड्यावर शौच, मलमुत्र विसर्जित न करणे जेणे करून पावसाळी हंगामात साथ रोग उद्भवू नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. उपजिल्हा रुग्णालय व सहा प्राथमिक आरोग्य केंद्र असून ही आरोग्य केंद्रे निजामपूर, शिरवली, साई, गोरेगाव, इंदापूर व नांदवी येथे कार्यरत असून या ठिकाणी पुरेसे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग व पुरेसा औषधासाठी तसेच रुग्ण वाहिकेच्या उत्तम, वातानुकूलित रुग्णवाहिका उपलब्ध आहे. तसेच पुरेसा ऑक्सिजन साठा व औषधे उपलब्ध आहेत. शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून रुग्णांना जास्तीत जास्त सेवा पुरवून आपले कर्तव्य बजावत आहेत. तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रात इंदापूर प्रा. आरोग्य केंद्रात 45 गावे 26048 लोकसंख्या आहे. नांदवी प्रा. आरोग्य केंद्रात 14 गावे 7140 लोकसंख्या आहे. शिरवली प्रा. आरोग्य केंद्रात 38 गावे 18792 लोकसंख्या आहे. गोरेगाव प्रा. आरोग्य केंद्रात 25 गावे 28936 लोकसंख्या आहे. साई प्रा. आरोग्य केंद्रात 47 गावे 34158 लोकसंख्या आहे. निजामपूर प्रा. आरोग्य केंद्रात 42 गावे 45300 लोकसंख्या आहे. तालुक्यातील एकूण 160374 लोकसंख्येतील नागरिकांना या आरोग्य केंद्राचा प्रथमिक उपचारासाठी उपयोग होतो.