वर्षभरात पुल बांधण्याचे नियोजन; अवजड वाहनांसाठी पुल बंद
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल सायन महामार्गावर रोडपाली येथील खाडीपुल धोकादायक असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे हाईटगेज उभारून अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली असून हलक्या वाहनांना यावरुन यापुढे जाता येणार आहे. पुढील वर्षभरात हा पुल बांधण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. रोडपाली येथील खाडी पुल सूमारे 50 वर्ष जुना आहे. जिर्ण अवस्थेतील पुलाच्या क्षमतेबद्दल अनेक नागरिक आणि राजकीय पुढाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रारी केल्यावर येथील वाढते अपघात ध्यानात घेऊन हा पुल सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने अवजड वाहनांसाठी बंद केला. हाईटेगेज लावण्याचे काम अंतिम टप्यात आहे. हाईटगेज लावल्यानंतर हा पुल हलक्या वाहनांसाठी खुला होऊ शकेल. रोडपाली खाडी पुलावर पनवेल ते सायन जाणाऱ्या महामार्गावर तीन पुल एकमेकांना आपसात जोडून रुंद पुल बनविण्यात आला आहे. यामुळे पुलजोडणीच्या कामात मोठी फट असल्याने या फटीत दुचाकीस्वारांना रात्रीच्यावेळी अपघातांना सामोरे जावे लागले.
सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांच्या चुकीच्या कामामुळे सामान्य वाहनचालकांना त्याचा त्रास होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनूसार रोडपाली येथील जुना खाडीपुलावर दोन मार्गिका आहेत. त्याची रुंदी साडेआठ मीटर तर लांबी 140 मीटर आहे. या पुलाच्या बांधकामासाठी 27 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पुढील काही दिवसात त्याची निविदा प्रक्रीया पार पडणार आहे. बांधकामापूर्वी पुलाचे पाडकाम आणि त्यानंतर नव्याने बांधकाम यासाठी वर्षभराचा वेळ लागण्याची शक्यता आहे.