| पुणे | वृत्तसंस्था |
ज्येष्ठ सामाजिक लेखक आणि विचारवंत हरी नरके यांचे निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते. मुंबईमधील बीकेसी येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती. अशात सकाळी मुंबईला येत असताना सहा वाजता गाडीत त्यांना दोन वेळा उलट्या झाल्या आणि हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रा. हरी नरके यांचा महाराष्ट्रातील समाजिक चळवळींशी निकटचा संबंध होता. शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारसरणीतील अग्रक्रमाचे विचारवंत म्हणून त्यांना ओळखले जात होते. ओबीसींच्या प्रश्नांवर नरके यांचा मोठा अभ्यास होता. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांचं उल्लेखनीय काम राहिलं. ते समता परिषदेचे उपाध्यक्ष देखील होते. या परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसींच्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरलं होतं.
प्रा. हरी नरके यांचा शैक्षणिक क्षेत्राशी अत्यंत निकटचा संबंध राहिला. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे अध्यासन प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. सोबतच पुण्यातील आंतरराष्ट्रीय किर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवरही त्यांनी महत्वपूर्ण कार्य केलं. संस्कृत, कन्नड, तेलुगू प्रमाणेच मराठी भाषाही एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून नरके यांनी योगदान दिले आहे.