प्रिझम संस्थेची पथनाट्यातून जनजागृती

। अलिबाग । वार्ताहर ।

अलिबागेतील सामाजिक वनीकरण विभाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वन दिनानिमित्त ग्लोबल वार्मिंग व समुद्र ठिकाणी त्याचा होणारा परिणाम या विषयावर अलिबाग समुद्र किनारी पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली.

प्लास्टिकचा अतिवापर, वृक्षतोड, कंपन्यामधून होणारे हवेचे प्रदूषण, वाहनातून उत्सर्जित होणारे घातक व विषारी वायू, विरळ होत चाललेला ओझोनचा थर, वणवे, नद्यामधील भराव अशा अनेक कारणांमुळे वातावरणातील तापमान वाढत जाऊन ग्लोबल वार्मिंगची समस्या अधिक तीव्र होत आहे. ज्यामुळे अनिश्‍चित पाऊस, सतत येणारी वादळे, किनारपट्टी लगतचे भूक्षेत्र पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली असून किनारपट्टी लगतचे जनजीवन, पर्यटन यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यासाठी वृक्षतोड थांबवली पाहिजे, वृक्षरोपण व वृक्षसंवर्धन केले पाहिजे, अधिकाधिक ई-वाहनांचा वापर केला पाहिजे, प्लास्टिक ऐवजी कापडी व कागदी पिशवी वापरली पाहिजे, हे या पथनाट्यातून सांगण्यात आले.

या कार्यक्रमाला वनक्षेत्रपाल प्रसाद गायकवाड, वनपाल संतोष साळुंखे, वनरक्षक गौरी कोळेकर, वनरक्षक महादेव नाईक आदी उपस्थित होते. या पथनाट्याचे नेतृत्व प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी यांनी केले. तर, या पथनाट्यात विनोद नाईक, निकी बेंडे, मलिनाथ जामदार, सेजल काठे, भक्ती गळवे, जान्हवी भंडारी, वेदिका लाडगे आदी कलाकार सहभागी झाले होते.

Exit mobile version