। पनवेल । प्रतिनिधी ।
नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात एका कैद्यावर दुसऱ्या कैद्याने पैशांसाठी दबाव टाकत मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत पीडित कैद्याचा दात तुटून तो गंभीर जखमी झाला असून, या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोजा मध्यवर्ती कारागृहातील सर्कल क्रमांक 3 मधील बॅरेक क्रमांक 8 मध्ये बुधवारी (दि. 15) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. तळोजा कारागृहात मुंबई माहिम येथील अल्तमश युसुफ शेख (38) हा न्यायबंदी आहे. अल्तमश याने दिलेल्या तक्रारीनूसार त्याच बॅरेकमध्ये असलेला मुबीन कादर शेख या कैद्याने 10 हजार रुपये मिळवून देण्यासाठी आपल्या बहिनीच्या नावाने चिठ्ठी लिहून देण्यास भाग पाडले. तसेच बाहेर गेल्यानंतर संबंधित रक्कम गुगल पेच्या माध्यमातून पाठवण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. मात्र, अल्तमश यांनी यास नकार दिल्यानंतर आरोपीने त्यांच्याशी शिवीगाळ करत धमकी दिली. यानंतर आरोपी मुबीन शेख याने अल्तमश यांना मारहाण केली. त्याने पोटात आणि कानाखाली जोरदार ठोसे मारले. या हल्ल्यात अल्तमश यांच्या तोंडातील उजव्या बाजूचा खालचा दात तुटला आणि तोंडातून रक्तस्राव सुरू झाला. घटनेनंतर त्यांना तातडीने कारागृहातील रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. या प्रकरणी 16 एप्रिल रोजी रात्री उशिरा खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सरला दसगुडे करत असून, अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
तळोजा कारागृहात पैशांसाठी कैद्याला मारहाण
