बस व प्रवाशांचे सामान जळून खाक; जीवितहानी नाही
| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबईहून कोकणच्या दिशेने निघालेल्या एका लक्झरी बसला रविवारी (दि.24) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. मुंबई–गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या सुरुवातीस ही दुर्घटना घडली असून, सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुरक्षितरित्या बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, आग एवढी भयानक होती की काही क्षणांतच संपूर्ण बस जळून खाक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, चालक सचिन रघुनाथ लोके (30) रा. खार मुंबई हा मनाली टूर्स अँड ट्रॅव्हल्सची खाजगी बस घेऊन बोरिवली ते मालवण असा जात असता कशेडी बोगद्याच्या सुरुवातीला पोहचताच अचानक बसच्या टायरचा मोठा आवाज झाला. यावेळी प्रसंगावधान दाखवून चालकाने बस थांबविल्याने प्रवाशांना बसमधून बाहेर पडता आले. बसचा टायर गरम झाल्याने पेट घेतला आणि काही क्षणांतच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. याच दरम्यान बसला आगीच्या ज्वाळांनी वेढले आणि संपूर्ण बस प्रवाशांच्या सामानासह भस्मसात झाली. मात्र, या खासगी बसमधील एकूण 44 प्रवासी 2 वाहक व 1 क्लीनर एकूण 47 जण बचावले.
या घटनेची माहिती पोलादपूर पोलीस ठाण्यात समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पीएसआय पवार, पोलीस हवालदार बामणे, ठाणे अंमलदार रंजेश पवार, जाधव, खराडे, कदम, मोरे, साळुंखे, शिंदे व होमगार्ड सुनील जगताप हे घटनास्थळी तातडीने रवाना झाले. याचवेळी कशेडी टॅप पोलीस मदत केंद्राचे पीएसआय संतोष डोलारे, पोलीस हवालदार चाटे व मोहिते यांनी ही घटनास्थळी जाऊन वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दक्षता घेतली.
घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलिसांनी तात्काळ खेड व महाड नगरपरिषद येथील अग्निशमन यंत्रणांना पाचारण केले. तसेच खेड आणि महाड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झाली होती. या घटनेमुळे मुंबई–गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आधीच महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी आहे. त्यात या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी काही तासांत वाहतूक सुरळीत केली असली तरी प्रवाशांमध्ये भीती व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. वाहतूक पूर्वपदावर आल्यानंतर पोलिसांनी या बसमधील प्रवाशांना मालवण दिशेने जाणाऱ्या वाहनांमध्ये बसवून आपआपल्या गावी रवाना करण्याची सोय केली. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी हवालदार रंजेश पवार हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.







