वेतन पथकात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी
| खरोशी | प्रतिनिधी |
मागील दोन-चार महिन्यांपासून रायगड जिल्हा खासगी प्राथमिक शाळांचे शिक्षकांचे पगार एक-एक महिना उशीर होत असल्याने सर्व शिक्षक बांधवांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. शासनाच्या शिक्षण विभागाकडून रायगड जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांसाठी वेतन व भविष्य निर्वाह निधीची कामे पूर्ण करण्यासाठी असलेल्या वेतन पथकात फक्त एकच कर्मचारी काम करीत असल्याने शाळांची कामे वेळेवर होत नाहीत. शिक्षण उपसंचालक यांच्याकडे संघटनेने मागणी करूनसुद्धा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जात नसल्याने शाळांनी संताप व्यक्त केला आहे.
रायगड जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळा एकूण 67 आहेत. यामध्ये तब्बल 500 पर्यंत शिक्षक, शिक्षकेतर, मुख्याध्यापक, कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या पगाराची बिले, भविष्य निर्वाह निधीच्या स्लिप तसेच विविध अन्य शिक्षकांच्या पगारासंबंधीची कामे पूर्ण केली जातात. मे महिन्यामध्ये शिक्षणाधिकारी आणि वेतन अधीक्षक यांची बदली झाल्यामुळे रायगड जिल्ह्यातील सर्व खासगी प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाहीत. परंतु, प्राथमिक शाळांसाठी असलेल्या वेतन पथकात फक्त एकच कर्मचारी उपलब्ध असल्याने त्यांच्यावर पूर्ण कार्यालयाचा भार आलेला आहे. या कार्यालयात पूर्वी अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, दोन सहाय्यक लिपिकांची पदे मंजूर आहेत. शासनाने पूर्वी ही पदे भरलेली होती. परंतु, सद्यःस्थितीमध्ये एकच कर्मचारी कामाचा डोंगर खांद्यावर घेऊन शिक्षकांची शाळांची कामे पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. याबाबत रायगड जिल्हा खासगी प्राथमिक शाळा कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने विभागीय सहाय्यक शिक्षण उपसंचालक सुनील सावंत यांची भेट घेऊन वेतन पथकामध्ये ज्यादा कर्मचारी देण्याची मागणी केली होती. परंतु, अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांचा खडखडाट झाल्याने शाळांची सर्वच कामे विलंबाने होत आहेत. तीन वर्षांच्या भविष्य निर्वाह निधीच्या स्लिपा अद्यापपर्यंत मिळालेल्या नाहीत. वेतन पथकाला कायमस्वरूपी अधीक्षक उपलब्ध होत नाहीत. जून महिन्याचा पगार 28 जुलैला झाला, तर जुलै महिन्याचा पगार 26 ऑगस्ट रोजी झाला. ऑगस्ट महिन्याचा पगार हा गणपतीच्या सुट्टीच्या अगोदर होणे आवश्यक होता. मात्र, गणपतीची सुट्टी आता संपत आली. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा पगार हा सप्टेंबरमध्ये कधी होईल याची शाश्वती नसल्याची नाराजी शिक्षक बांधवांनी व्यक्त केली आहे.
अनेक बांधवांनी घर खरेदी, गाड्या खरेदी केल्या आहेत. त्यांचे हप्ते वेळेवर जात नाहीत. त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी फी द्यावी लागत आहे. मात्र, पगारच वेळेवर होत नसल्यामुळे अनेक शिक्षक बांधवांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. कर्जाचे हप्ते नियमित न केल्याने चक्रवाढ व्याजाच्या दंडाचा दणकाही कर्मचाऱ्यांना बसत आहे. याकामी शिक्षण उपसंचालक यांनी तात्काळ वेतन खात्यामधील कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करावी आणि कायमस्वरूपी वेतन खात्यामध्ये कर्मचारी द्यावेत, अशी मागणीही आता शिक्षकांनी केली आहे. रायगड जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा भोसले आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी विशेष लक्ष देऊन वेतन खात्यातील त्रुटी दूर कराव्यात आणि शिक्षक बांधवांचा पगार एक तारखेला कसा होईल यासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी रायगड जिल्हा खासगी प्राथमिक शाळा संघटनेनी केली आहे.
शासनाने वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांची 600 पदे आहेत. यापैकी फक्त 100 पदे शासनाने भरलेली आहेत. अनेक ठिकाणी रिक्त पदांमध्ये कर्मचारी भरले नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची स्थिती निर्माण होत आहे. शासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन पदे भरली पाहिजेत. रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये गटशिक्षणाधिकारीही नेमलेले नाहीत. त्याचाही कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे दिलेला आहे. त्यामुळे पदांची कमतरता ही सर्वच बाबतीमध्ये आहे. लवकरात लवकर एका लिपिकाची नियुक्ती निश्चितच खासगी प्राथमिक वेतन पथकामध्ये केली जाईल असे सांगितले.
– सुनील सावंत, शिक्षण सहाय्यक उपसंचालक
