प्रा. अस्मिता पाटील यांना पीएच.डी. जाहीर

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील सुतारपाडा गावातील रहिवासी आणि सध्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्रा. अस्मिता भगवान पाटील यांना मुंबई विद्यापीठाची डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी जाहीर झाली आहे. त्यांच्या या यशामुळे सुतारपाडा गावासह शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

प्रा. अस्मिता पाटील यांनी डॉ. पतंगराव कदम कला व वाणिज्य महाविद्यालय, पेण, जि. रायगड येथील संशोधन केंद्रातून हिंदी विषयात संशोधन पूर्ण केले. सूर्यबाला के कथा साहित्य में व्यक्ति, परिवार और समाज का स्वरूप या विषयावर त्यांनी आपला शोधप्रबंध सादर केला होता. संशोधन मार्गदर्शिका डॉ. संगीता सूर्यकांत चित्रकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधनकार्य यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यांच्या शोधप्रबंधाला मुंबई विद्यापीठाने मान्यता दिल्यानंतर त्यांना पीएच.डी. पदवी जाहीर झाली.

प्रा. अस्मिता पाटील यांचे महाविद्यालयीन शिक्षण कोंकण एज्युकेशन सोसायटीच्या लक्ष्मी-शालिनी महिला महाविद्यालय, पेझारी येथे झाले. या काळात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल बांगर तसेच सर्व प्राध्यापकांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे, ज्या महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले, त्याच महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख व संशोधन मार्गदर्शिका डॉ. संगीता सूर्यकांत चित्रकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना संशोधन करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रवासात या महाविद्यालयाचे आणि मार्गदर्शिकेचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

या यशाबद्दल संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. मुरलीधर वाघ यांनी संशोधन मार्गदर्शिका डॉ. संगीता सूर्यकांत चित्रकोटी आणि संशोधक प्रा. अस्मिता पाटील यांचे अभिनंदन केले. अस्मिता पाटील यांना पीएच.डी. पदवी जाहीर झाल्याबद्दल कोकण एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मंगेश जी. नेने, खजिनदार संजय जी. कडू, संस्थेचे सर्व पदाधिकारी, भाऊसाहेब नेने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदानंद धारप तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख आणि प्राध्यापक वृंद यांनीही त्यांचे विशेष अभिनंदन केले.

Exit mobile version