। माथेरान । वार्ताहर ।
देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्वत्र हर घर तिरंगा उपक्रम राबविला जाणार आहे. त्याअतंर्गत माथेरानमध्ये समाज, शाळा, संस्था यांनी पुढे येऊन या उपक्रमात सामील झाल्या आहेत. याची सुरुवात दि.9 ऑगस्ट, म्हणजे क्रांती दिनापासून होत आहे. येथील प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्या मंदिर शाळेने 9 ते 15 ऑगस्टपर्यंतचा कार्यक्रम आखला आहे. तर, क्षत्रीय मराठा महिला मंडळ आणि कोकणवासीय समाज यांच्याकडून मध्यवर्ती चौकात अनेक कार्यक्रम होणार आहेत.
माथेरान नगरपालिकेने या उपक्रमात सामील होण्याचे आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत संस्था, शाळा आणि समाज हे उपक्रम राबविणार आहेत. त्या अंतर्गत 9 ऑगस्ट क्रांतीदिनी सकाळी 8.30 वाजता क्षत्रिय मराठा महिला मंडळाकडून टाळ गजर आयोजित केला आहे. येथील कोकणवासिय समाजाकडून दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता गावातून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये महिला, पुरुष हे वेगवेगळ्या वेशभूषा करून सामील होणार आहेत. तसेच येथील प्रा. शांताराम यशवंत गव्हाणकर विद्या मंदिर येथे 9 ते 15 ऑगस्ट प्रत्येक दिवशी एक उपक्रम राबविला जाणार आहे. दरम्यान, मंगळवार 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन प्रभात फेरी, पथनाट्य, स्वातंत्र्यसैनिक स्मृतिस्थळांना भेटी, बुधवार (10) गीतगायन स्पर्धा, गुरुवार (11) बुद्धिबर्ळें शुक्रवार (12) प्रश्नमंजुषा, शनिवार (13) वक्तृत्व, निबंध स्पर्धा, वृक्षारोपण, रविवार (14) चित्रकला स्पर्धा, सोमवार (15) स्वातंत्र्यदिन, प्रभात फेरी, लेझीम नृत्य आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, ते माथेरान कम्युनिटी सेंटर आणि शाळा या ठिकाणी घेतले जाणार आहेत.