। रोहा । प्रतिनिधी ।
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने ‘आजादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाने जनतेच्या मनात भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे, या उद्देशाने 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये ‘हर घर तिरंगा’ उपक्रम खांबेरे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावे आणि वाड्या वस्त्यांवर राबविण्याचे निश्चित केले आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सर्व सदस्य तसेच शिक्षक, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, आशा सेविका, गावातील तरुण व महिला मंडळ, बचत गट तसेच गाव अध्यक्ष यांच्या पुढाकाराने उपरोक्त कालावधीत घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार असून, त्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वत: विकत घेऊन उभारण्यासाठी त्यांना प्रेरित करण्यासाठी गावागावात संदेश यात्रा व प्रभात फेर्या काढण्यात येत असून, त्यांना स्थानिक ग्रामस्थ व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
15 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयातील मुख्य झेंडावंदन कार्यक्रमानंतर ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, समूह गीत गायन व देशभक्तीपर भाषण स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आली असून, सर्व गावांमध्ये स्वच्छता अभियान तसेच महिलांसाठी विविध प्रकारच्या मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत हद्दीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा व्हावा यासाठी सरपंच गीता वारगुडे, उपसरपंच जयश्री जोशी, ग्रामसेवक राजेंद्र पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य बबन पडवळ, आत्माराम कासार, आतिष मोरे, मयुरी मोरे, मनिषा घोगरे, मनिषा फळसकर, वंदना मोरे, दीप्ती गिजे तसेच सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पोलीस पाटील यांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे.