। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव पोलीस ठाण्यातर्फे सोमवारी सकाळी 8.30 वाजता माणगाव प्रांत कार्यालयासमोर स्वातंत्र्याची अमृतमहोत्सवी दौड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
स्वातंत्र्य मिळवून देणार्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच 75 वर्षांच्या गौरवशाली परंपरेला मांडत प्रत्येकाच्या मनात देशाभिमान जागृत करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ उपक्रम देशभर राबविण्यात येणार आहेत. हे अभियान माणगावात दि.13 ते 15 ऑगस्टदरम्यान यशस्वीपणे राबविण्यासाठी माणगावकर सज्ज झाले आहेत.
माणगाव नगरपंचायतीपाठोपाठ माणगाव पोलीस ठाण्यातर्फे अमृत महोत्सवी दौड व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फुलांच्या हारांनी जीपगाडी सजवून माणगाव प्रांत कार्यालय येथून प्रभात फेरी उत्साहात काढण्यात आली. ही दौड व प्रभातफेरी प्रांत कार्यालय येथून मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव मोर्बा रोड मार्गावरून वळसा घालून पुढे नवीन बसस्थानक येथून वळसा घालून निजामपूर रोडमार्गे कालवा रोड ते पुन्हा प्रांत कार्यालय अशी काढण्यात आली.
यामध्ये तळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमासे, गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नावले यांच्यासह रायगड पोलीस दल, एन.सी.सी पथक गोरेगाव, रायगड पोलीस दलाचे बँड पथक, अशोकदादा साबळे विद्यालय माणगावचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, छत्रपती करिअर अकॅडमी आर्मी व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र माणगावचे विद्यार्थी, शिक्षक तसेच लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.