| पनवेल | प्रतिनिधी |
खारघरमध्ये शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करुन सोन्याच्या दागिन्यांची लुट, बनावट चावीचा वापर करुन घरातील लाखो रुपये रोख रक्कम चोरी, तसेच मोबाईल फोन चोरी आणि हरवलेले मोबाईल फोन असा लाखो रुपये किंमतीचा मुद्देमाल खारघर पोलिसांकडून तंत्रशुध्द तपास करुन हस्तगत करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, सांगलीसह राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, झारखंड इत्यादी राज्यांमधून सातत्याने पाठपुरावा करुन सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल फोन हस्तगत केलेले आहेत. खारघर येथील प्रतिष्ठित व्यक्तीला चाकुने वार करुन त्याचे एकुण 57 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटले होते. या गुन्ह्यामध्ये एकुण 7 आरोपी अटक करुन त्यांच्याकडून दागिने सांगली जिल्ह्यातून हस्तगत केले आहेत. येथील एका घराचा दरवाजा बनावट चावीने उघडुन घरातील एकुण 27 लाख रुपये रोख रक्कम चोरी केली होती. या गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक करुन त्याच्याकडुन गुन्ह्यात चोरी केलेले पुर्ण 27 लाख रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खारघर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सन 2025 व सन 2026 मध्ये हरवलेले तसेच चोरीस गेलेले मोबाईल फोन तांत्रिकदृष्ट्या शोध घेऊन महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये शोध घेऊन एकुण 10 लाख 74 हजार रुपये किंमतीचे एकुण 50 मोबाईल फोन हस्तगत केलेले आहेत. एकंदरीत खारघर पोलिसांकडून गुन्ह्यांमधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व हरवलेले मोबाईल फोन असा एकुण 94 लाख 74 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन हा मुद्देमाल त्यांच्या मुळ मालकांना परत करण्यात आला आहे.
खारघर पोलिसांकडून हस्तगत मुद्देमाल परत
