पर्यायी रस्त्यासाठी अधिसूचना जाहीर
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत येथे पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायत मध्ये प्रस्तावित असलेल्या टोरंट धरण प्रकल्पाच्या रस्त्यासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. भालिवडीपासून पाली साई डोंगर असा रस्ता बनविला जाणार आहे; मात्र, त्या रस्त्याला शेतकऱ्यांचा विरोध वाढला आहे. हे लक्षात घेऊन पाटबंधारे खात्याने हुमगाव पासून साई डोंगर पर्यंत मिसिंग लिंक बनवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या 800 मीटर लांबीच्या रस्त्यासाठी जिल्हा भूसंपादन अधिकारी यांनी अधिसूचना जारी केली आहे. दरम्यान, या मिसिंग लिंक प्रकल्पासाठी हुमगाव आणि साई डोंगर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत.
कर्जत तालुक्यातील हुमगाव येथील अनुसूची एकमध्ये समाविष्ट असलेल्या जमिनीवर टोरंट पावर कंपनीच्या प्रस्तावित साईडोंगर-1 कर्जत (3000 एमव्ही) उदंचन जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाच्या उदंचन केंद्रावर जाण्यासाठी भालिवडी पासून साई डोंगर असा रस्ता प्रस्तावित आहे. मात्र, त्या 5.91 किलोमीटर लांबीचा रस्त्यासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या रस्त्यासाठी 390 शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्याची नोटीस भूसंपादन विभागाने बजावली आहे. या प्रकल्पाला पर्यायी रस्ता म्हणून राजनाला कालवा व पाली पोटल कालवा यांच्या दरम्यान मिसिंग लिंक रस्त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यासाठी सार्वजनिक प्रयोजनाकरीता महसूल आणि वन विभागाच्या भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.
या मिसिंग लिंक प्रकल्पासाठी 800 मीटर लांबीचा रस्ता बनविला जाणार आहे. खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने कोलाड येथील रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंतांच्या नावे घेण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. तसेच, या प्रकल्पासाठी जमीन थेट खरेदी करताना जिल्हास्तरीय समिती मार्फत संबंधित जमीनीसाठी परिगणित होणाऱ्या एकूण मोबदल्याच्या रक्कमेवर 25 टक्के रक्कम वाढीव देऊन मोबदला निश्चित करण्यात येईल, अशी लालुच दाखवण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित भूधारकांकडून शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे खासगी जमीन वाटाघाटीद्वारे खरेदी देण्यास स्वेच्छेने तयार असल्याबाबत व जिल्हास्तरीय समितीने निश्चीत केलेला मोबदला संपूर्णतः अंतिमरित्या स्विकारण्यास तयार असल्याबाबतची संमतीपत्र (विकल्प) मागवित आहे. परंतु, या नवीन रस्त्यामुळे टोरंट प्रकल्प रस्ता पुन्हा चर्चेत आला आहे.
