खारबंदिस्तीचा प्रश्न पेटला

75 कोटींचा प्रस्ताव लालफितीत; जिल्ह्यातील शेतकरी संकटात

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात पावसाळ्यातील उधाण आणि खाऱ्या पाण्याच्या सततच्या माऱ्यामुळे संरक्षणात्मक बंधारे कमकुवत झाले असतानाच त्यांच्या दुरुस्तीसाठीचा तब्बल 75 कोटींचा प्रस्ताव गेल्या चार वर्षांपासून लालफितीत अडकून पडल्याने हजारो एकर शेती धोक्यात आली असून, शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागात खारबंदिस्तीचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात येणाऱ्या उधाणाच्या लाटांमुळे आणि भरतीच्या पाण्याच्या माऱ्यामुळे खारेपाटातील संरक्षणात्मक बंधारे मोठ्या प्रमाणात कमकुवत झाले आहेत. या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवलेला 75 कोटी 86 लाख रुपयांचा प्रस्ताव गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.

रायगड जिल्ह्यात सुमारे 22 हजार 559 हेक्टर खारभूमी क्षेत्र असून अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन हे तालुके सागरी किनारपट्टीला लागून आहेत. या भागात भातशेती, नारळ लागवड तसेच मत्स्यशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, ही जमीन उच्चतम भरती रेषेपेक्षा सुमारे दोन मीटर खाली असल्याने खारे पाणी सहजपणे शेतांमध्ये शिरते. परिणामी, जमीन नापीक होण्याचा धोका वाढत असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

दरवर्षी पावसाळ्यात आणि भरतीच्या काळात उधाणाचा जबरदस्त मारा बंधाऱ्यांवर होत असल्याने त्यांची झपाट्याने झीज होत आहे. अनेक ठिकाणी बंधारे तुटण्याच्या स्थितीत असून खारे पाणी थेट सुपीक जमिनीत घुसत आहे. यामुळे भातशेतीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शेतकऱ्यांसमोर उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याची भीती कायम आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन खारलँड विभागाने 150 हून अधिक बंदिस्ती योजनांचे आराखडे तयार केले आहेत. मात्र, निधीअभावी या योजना प्रत्यक्षात येऊ शकलेल्या नाहीत. शासकीय उदासीनता, दप्तर दिरंगाई आणि अपुऱ्या निधीमुळे बंधाऱ्यांची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत असून, शेतकऱ्यांचे संकट अधिक गडद होत आहे.

एकूणच, खारबंदिस्तीचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने निधी मंजूर न झाल्यास रायगड जिल्ह्यातील हजारो एकर सुपीक जमीन नापीक होण्याचा धोका निर्माण झाला असून, शेतकऱ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

शेततलावही धोक्यात
भरतीच्या वेळी खारे पाणी थेट शेततलावांमध्ये शिरत असल्याने मत्स्यपालनालाही मोठा फटका बसत आहे. तलावांमधील बीज तसेच विक्रीयोग्य मासळी वाहून जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत. अलीकडील पावसामुळे अनेक ठिकाणी भातशेती पूर्णपणे पाण्याखाली गेली असून, शेततलावातील मत्स्यजीवही नष्ट झाले आहेत. त्यामुळे शेततलाव व्यवसायही संकटात सापडल्याचे चित्र आहे.

बांधबंदिस्तीचा प्रस्ताव कोकण सौम्यकरण योजनेतून राज्य शासनाकडे पाठवलेला आहे; मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. याशिवाय नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे प्रस्तावही शासनाकडे सादर केले आहेत.

– सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड

Exit mobile version