निगडोलीच्या पुलाचे संरक्षण रेलिंग गेले वाहून

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यातील निगडोली येथे काही वर्षी बांधलेला नवीन पुलाला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला असून, पुलावरील संरक्षण रेलिंग पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले आहे. तसेच पुलाच्या संरक्षणासाठी बसविण्यात आलेले सिमेंट स्लॅब आणि ब्लॉकही उखडून गेल्याने पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

खोपोली-खालापूरला, चौक तसेच या परिसरातील असणाऱ्या गावांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्याने या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात हलकी व जड वाहने तसेच ग्रामस्थांची ये-जा सुरू असते. मात्र संरक्षण रेलिंग नसल्याने पुलावरून प्रवास करताना वाहनचालकांना मोठी जोखीम पत्करावी लागत आहे. पावसाचा वेग सध्या जरी नसला तरी सुद्धा अजून पाऊस संपलेला नाही. यामुळे या पुलाचे आणखी नुकसान होण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पुलाची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी केली आहे. विशेषतः वाहून गेलेले संरक्षण रेलिंग पुन्हा उभारणे, उखडलेले सिमेंट स्लॅब व ब्लॉक दुरुस्त करणे आणि पुलाच्या सुरक्षिततेची तपासणी करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.सध्या पुलावरील वाहतूक सुरू असली तरी संभाव्य अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने प्रवास करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Exit mobile version