आंबा पिकांच्या रक्षणासाठी रक्षक सापळे

उरण कृषी विभागाकडून प्रात्यक्षिक

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील आंबा बागायतदारांच्या आंबा पिकावर पडणाऱ्या फळमाशीच्या आक्रमणाला थोपविण्यासाठी फळ रक्षक सापळे लावण्यात आले असून, त्याचे प्रात्यक्षिक उरण तालुक्यातील चिरनेर येथील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या बागेत बुधवारी 18 मार्च रोजी उरण तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ यांच्या मार्गदर्शनाखाली दाखविण्यात आले.

यावेळी उरणच्या कृषी सहाय्यक अधिकारी सुषमा गायकवाड यांनी रक्षक सापळ्याच्या मदतीने आंबा बागायतदारांना आंबा फळांच्या रक्षणाची प्रात्यक्षिके करून दाखविली. यामध्ये रक्षक सापळा हा सावलीत जमिनीपासून तीन ते चार फूट उंचीवर लावून, दोन सापळ्यातील अंतर किमान 300 फूट याप्रमाणे रक्षक सापळे आंबा झाडाला टांगून, प्रथम सापळ्यातील डबीत आळ्या कीटकांना आकर्षित करणारे मोहगंध औषध ठेवून, त्यानंतर प्लास्टिक बरणीच्या बुडाशी अर्धा लिटर साबणाचे पाणी भरून बरणीच्या हुकाची बांधणी करून घ्यावी. त्यानंतर पंधरा दिवसाच्या अंतराने किंवा रक्षक सापळ्यात अडकलेल्या माशांच्या प्रमाणानुसार बरणी स्वच्छ करून घ्यावी. माशांना आकर्षित करून घेणाऱ्या मोहगंधाच्या औषधाचा वापर दिलेल्या सूचनेनुसार व कालमर्यादेनुसार करावा. अशी माहिती कृषी सहाय्यक अधिकारी सुषमा गायकवाड यांनी शेतकऱ्यांना प्रात्याक्षिकेतून दिली. यावेळी तालुक्यातील कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील, जगदीश ठाकुर, भास्कर ठाकूर, दामोदर मुंबईकर, अस्मित ठाकूर समाधान पाटील यांच्यासह अन्य शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उरण तालुका हा कृषीप्रधान तालुका आहे. येथे पावसाळी हंगामात प्रामुख्याने भात पिकाची लागवड केली जाते. नैसर्गिक पावसाच्या पाण्यावर आधारित असलेले हे पीक येथील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असून, अधिक उत्पादन देणारे व शाश्वत पीक आहे. या भात पिकाबरोबर तालुक्यात आंबा पीकही मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. मात्र, बदलत्या हवामानाचा फटका तालुक्यातील आंबा फळ पिकांना बसत आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना मनुष्यबळाचा आधार घेत औषध फवारणी करावी लागत आहे. परंतु, त्यासाठी वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. याशिवाय औद्योगिकरणामुळे तालुक्यात शेतमजुरांचीही मोठी कमतरता भासत असल्यामुळे आंबा बागायतदारांच्या मशागतीच्या कामात अडचणी येत आहेत. फळ माशांना थोपविण्यासाठी रक्षक सापळे उपयुक्त ठरणार आहेत.

प्रफुल्ल खारपाटील
कृषीमित्र चिरनेर

उरण तालुक्यात आंबा पिकाच्या लागवडीखाली एकूण क्षेत्रफळ 164.97 हेक्टर इतके आहे. शासनाच्या कृषी विभागाने आंबा बागायतदारांसाठी अनेक नावीन्यपूर्ण योजना राबविल्या आहेत. ही नाविन्यपूर्ण रक्षक सापळा योजना तालुक्यात राबविली जात असून, त्याचे प्रात्यक्षिक चिरनेर येथील आंबा बागातदारांच्या बागेत कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

अर्चना सुळ
तालुका कृषी अधिकारी उरण
Exit mobile version