पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टीशनर असोसिएशनकडून निषेध
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टीशनर असोसिएशनने शनिवारी कोलकात्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एका महिला डॉक्टरवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा तीव्र निषेध करत काळी फीत लावून आंदोलन केले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र आणि समाजात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.
आंदोलनाच्या अंतर्गत, असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी आपल्या प्रॅक्टिसिंग क्षेत्रात पांढर्या शर्टवर काळी फीत लावून आपला निषेध व्यक्त केला. या आंदोलनाचा उद्देश संबंधित यंत्रणेला त्यांच्या उत्तरदायित्वाची जाणीव करून देणे आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी करणे होता. याशिवाय असोसिएशनच्या सदस्यांनी तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना भेट देऊन एक निवेदन पत्र सादर केले. या पत्राद्वारे त्यांनी डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही डॉक्टरांवर किंवा नागरिकावर असा अन्याय होणार नाही, याची खात्री करता येईल.
डॉ. वैभव मोकल यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात असोसिएशनच्या डॉ. विवेक महाजन सचिव, खजिनदार डॉ. संदेश बहाडकर, डॉ. स्वप्नील लोखंडे, डॉ. आशिष गांधी, डॉ. सिद्धार्थ कौशिक, डॉ. वैभव पाटील, डॉ. स्वप्नील बाविस्कर, डॉ. शेख, डॉ. ताजिन मुल्ला, डॉ. शिरीष फापल, डॉ. वैशाली म्हात्रे, डॉ. अंजनी परब, डॉ. शीतल सोमवंशी, डॉ. प्रतिज्ञा साबणे, डॉ. रसिका पाटील, डॉ. रिद्धी मोकल, विजेता कौशिक यांसह असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि एकजुटीने आपल्या सहकार्याला न्याय मिळवून देण्यासाठी व भविष्यातील सुरक्षा वाढवण्यासाठी ठोस भूमिका घेतली.